गांधी हत्येनंतर झालेल्या ब्राह्मणांच्या हत्याकांडाला उत्तरदायी कोण ?

इतिहासकार विक्रम संपत यांनी ‘टाइम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये म. गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसच्या राजवटीत ब्राह्मणांवर झालेल्या अत्याचाराविषयी भाष्य केले. याविषयाला धरून हे लेखन…

‘टाइम्स नाऊ’ वर बोलताना विक्रम संपत (उजवीकडे)

…तर पुण्याची राखरांगोळी झाली असती !

नथुराम गोडसे हे ब्राह्मण असल्यामुळे गांधी यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण समाजाला जाणूनबुजून लक्ष्य करण्यात आले. पुण्यासारख्या शहरात ब्राह्मणांची वस्ती अधिक होती. त्या वेळेला पुण्याचे जिल्हाधिकारी सदाशिव गोविंद बर्वे हे होते. ‘पुणे येथे शांतता प्रस्थापित करायची आहे’, असा बहाणा करत काँग्रेसच्या तत्कालीन एका मंत्र्यांनी पुणे येथे दौरा करण्याचे ठरवले. ‘ते मंत्री ब्राह्मणद्वष्टे आहेत’, याची बर्वे यांना कल्पना होती. ‘आग विझवण्यासाठी नाही, तर आगीत तेल ओतण्यासाठी त्यांनी दौरा आखला आहे’, हा त्यांचा कावा बर्वे यांना ठाऊक होता. त्यांनी नि:क्षून सांगितले, ‘मी जिल्हाधिकारी या नात्याने तुम्हाला दौर्‍याची अनुमती देऊ शकत नाही.’ रॉकेलचे डबे आणि बोळे अनर्थ घडवण्यासाठी सिद्धच होते. बर्वे यांनी त्यांच्या दौर्‍याला अनुमती दिली असती, तर पुण्याची राखरांगोळी झाली असती.

श्रीमती संध्या काटदरे

या अन्यायाला उत्तरदायी कोण ?

यामागील सूत्रधार कोण आहे ? याची माहिती ब्राह्मण समाजाला असूनही त्याचा त्यांनी सूड कधीही घेतला नाही. एवढ्यावरच हा ब्राह्मणद्वेष थांबला नाही. अधिकतर ब्राह्मण शेतकरी होते. ते ब्राह्मणेतर वर्गाकडून शेतीची मशागत करून घेत असत. त्यांना ‘कुळ’ असे म्हणत. कुळ आणि ब्राह्मण यांचे संबंध सलोख्याचे होते. ब्राह्मणांनी त्यांच्या कुळांची कधीही पिळवणूक केली नाही. असे असतांनाही ब्राह्मणद्वेषाने पछाडलेल्या तत्कालीन शासनकर्त्यांनी ब्राह्मणांना भिकेकंगाल करण्यासाठी ‘कुळ कायदा’ निर्माण केला आणि ब्राह्मणांच्या जमिनी कुळांच्या घशात घातल्या. उपजीविकेचे साधनच नष्ट केले गेले, तरीही ब्राह्मण गप्पच राहिले. शाहू, फुले, आंबेडकर यांचा उदोउदो करणार्‍यांनी या अन्यायाला उत्तरदायी कोण ? याचे उत्तर द्यायला हवे.

राष्ट्रासाठी गोर्‍यांच्या आमीषाला लाथाडणारे राष्ट्रभक्त चिंतामणराव देशमुख !

याच संदर्भात एक आठवण सांगावीशी वाटते. चिंतामणराव देशमुख हे प्रसिद्ध आणि निष्णात अर्थतज्ञ होते. भारत सरकारने म्हणजे त्या काळच्या काँग्रेसच्या शासनकर्त्यांनी त्यांना बाजूला सारले; कारण ते ब्राह्मण होते. हे जेव्हा अमेरिकन शासनकर्त्यांना समजले, तेव्हा त्यांनी देशमुख यांना पाचारण करून सांगितले की, ‘तुम्ही आमच्याकडे या.’ राष्ट्रभक्त देशमुख यांनी बाणेदारपणे सांगितले की, माझ्या बुद्धीमत्तेचा उपयोग केवळ माझ्या राष्ट्रासाठीच करीन.

– श्रीमती संध्या काटदरे, रायगड