नामजप आणि स्वभावदोष निर्मूलन यांमुळे आनंदप्राप्ती होते ! – पू. (सौ.) भावना शिंदे, अमेरिका

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘आनंदप्राप्ती’ या विषयावरील संशोधन श्रीलंका येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत सादर !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले हे शोधनिबंधाचे लेखक, तर विश्वविद्यालयाच्या डॉ. (सौ.) नंदिनी सामंत या सहलेखिका

नवी देहली – ‘सतत सर्वाेच्च सुख (आनंद) अनुभवण्याची ओढ’, ही मानवाच्या प्रत्येक कृतीमागील प्रेरणा असते. असे असूनही संपूर्ण मानवजात ज्यासाठी आसुसलेली आहे, त्या ‘आनंदप्राप्ती’ या विषयावर सध्याची विद्यालये आणि महाविद्यालये यांमध्ये कोणत्याही प्रकारचे शिक्षण दिले जात नाही. नामजप, तसेच स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन यांचा अंगीकार केल्यास सर्वाेच्च अन् कायमस्वरूपी टिकणारे सुख, म्हणजेच आनंदप्राप्ती होते, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या पू. (सौ.) भावना शिंदे यांनी केले. त्या ‘थर्ड वर्ल्ड कॉन्फरन्स ऑन चिल्ड्रन अँड यूथ २०२१ : द व्हर्च्युअल कॉन्फरन्स’ (लहान मुले आणि युवा यांच्यावर आधारित तिसरी जागतिक परिषद) या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलत होत्या. ऑनलाईन माध्यमातून झालेली ही परिषद ‘दी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज मॅनेजमेंट, श्रीलंका’ यांनी आयोजित केली होती. पू. (सौ.) भावना शिंदे यांनी या परिषदेत ‘तणावपूर्ण जगात आनंद मिळवण्याचे उपाय’ हा शोधनिबंध सादर केला. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक असून विश्वविद्यालयाच्या डॉ. (सौ.) नंदिनी सामंत या सहलेखिका आहेत.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने वैज्ञानिक परिषदांमध्ये सादर केलेले हे ७६ वे सादरीकरण होते. यापूर्वी विश्वविद्यालयाने १५ राष्ट्रीय आणि ६० आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी ५ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये विश्वविद्यालयाला ‘सर्वाेत्कृष्ट शोधनिबंध’ म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे.

पू. (सौ.) भावना शिंदे

पू. (सौ.) भावना शिंदे पुढे म्हणाल्या की, जीवनातील समस्यांमुळे आपण दुःखी होतो. आपल्या जीवनातील समस्यांमागे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशी ३ मूलभूत कारणे असतात. जीवनातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक समस्या आध्यात्मिक कारणांमुळे असतात; परंतु त्या शारीरिक किंवा मानसिक समस्यांच्या स्वरूपात प्रकट होऊ शकतात. प्रारब्ध, पूर्वजांचे अतृप्त लिंगदेह आणि सूक्ष्मातील वाईट शक्ती, ही ३ प्रमुख आध्यात्मिक कारणे होत. जेव्हा एखाद्या समस्येचे मूलभूत कारण आध्यात्मिक असते, तेव्हा उपाययोजनाही आध्यात्मिकच करणे आवश्यक असते. आध्यात्मिक उपायांनी शारीरिक आणि मानसिक समस्यांचे निराकरण करण्यातही साहाय्य होते, विशेषतः तेव्हा जेव्हा या समस्यांचे मूलभूत कारण हे आध्यात्मिक असते.

१. या प्रसंगी पू. (सौ.) शिंदे यांनी आनंदप्राप्ती करण्यासाठी आवश्यक प्रयत्नांपैकी ‘नामजप’ आणि ‘स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया’ यांवर भर दिला. त्या म्हणाल्या, ‘‘प्रत्येक व्यक्ती आपापल्या धर्मानुसार सांगितलेला नामजप करू शकते. आजच्या काळासाठी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा अत्यंत उपयुक्त नामजप आहे.

२. पू. (सौ.) शिंदे यांनी नामजपाच्या सकारात्मक परिणामांचे मापन करण्यासाठी केलेल्या एका प्रयोगाविषयी माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘बायो-वेल जी.डी.व्ही.’ (टीप) या वैज्ञानिक उपकरणाच्या माध्यमातून व्यक्तीच्या कुंडलिनी चक्रांचे मापन केले जाते. या प्रयोगात एका व्यक्तीची कुंडलिनी चक्रे ही ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप केवळ ४० मिनिटे केल्यानंतर मध्यभागी एका रेषेत आल्याचे लक्षात आले. कुंडलिनी चक्रांची ही स्थिती त्या व्यक्तीची अधिक चांगली शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्थिती दर्शवते.’

३. ‘स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिये’चे महत्त्व विशद करतांना त्या म्हणाल्या, ‘‘मनातील स्वभावदोषांचे संस्कार नष्ट करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ही प्रक्रिया विकसित केली आहे. या प्रक्रियेसंदर्भात केलेल्या एका सर्वेक्षणात ५० व्यक्तींनी सहभाग घेतला होता. त्यांतील ९० टक्के व्यक्ती या व्यावसायिक होत्या. त्या व्यक्तींनी सांगितले की, ‘त्यांना त्यांच्यातील स्वभावदोषांना ५० ते ८० टक्के न्यून करण्यासाठी लागलेला सर्वसाधारण कालावधी २ वर्षे ५ मास होता.’ नातेसंबंधांत आणि कार्यक्षमतेत सुधारणा होणे, हे सर्वांनीच अनुभवले असले, तरी नातेसंबंधांत पुष्कळ प्रमाणात सुधारणा झाली, असे ७३ टक्के व्यक्तींनी सांगितले, तर कार्यक्षमतेत पुष्कळ प्रमाणात सुधारणा झाली, असे ७७ टक्के व्यक्तींनी सांगितले.’’

टीप – ‘बायो-वेल जी.डी.व्ही. (Bio-well GDV)’ उपकरणाची माहिती : ‘रशियातील डॉ. कॉन्स्टनटीन कोरोटकोव्ह यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांनी ‘गॅस डिस्चार्ज व्हिजुअलायजेशन’ या तंत्रज्ञानावर आधारित ‘बायो-वेल’ हे उपकरण बनवले आहे. यात व्यक्तीच्या ऊर्जेचे परीक्षण करण्यास उपयुक्त असा एक छायाचित्रक (कॅमेरा) आणि संगणकीय प्रणाली वापरली आहे. या उपकरणाद्वारे परीक्षण करतांना व्यक्तीच्या हाताच्या प्रत्येक बोटाला एक वेदनारहित हलकासा विद्युत् झटका सेकंदापेक्षाही कमी कालावधीसाठी दिला जातो. त्यामुळे व्यक्तीच्या त्वचेतून ‘फोटॉन’ आणि ‘इलेक्ट्रॉन’ या अतिसूक्ष्म कणांच्या होणार्‍या प्रक्षेपणास चालना मिळते. प्रत्येक बोटातून होणार्‍या ‘फोटॉन’ कणांच्या प्रक्षेपणाची छायाचित्रे ‘बायो-वेल जी.डी.व्ही. (Bio-well GDV)’ उपकरणातील छायाचित्रकाद्वारे टिपली जातात आणि त्याच्या आधारे संगणकीय प्रणालीच्या साहाय्याने व्यक्तीचे ऊर्जाक्षेत्र, तणाव आणि त्यांच्या संतुलनाची माहिती मिळते. यासमवेतच व्यक्तीच्या कुंडलिनीचक्रांची स्थितीही लक्षात येते.’