जिल्हा बँकेच्या निवडणुकीस ‘सहकार निवडणूक प्राधिकरणा’ची मान्यता !
सातारा, १५ ऑगस्ट (वार्ता.) – कोरोनामुळे रखडलेल्या जिल्हा बँक निवडणुकींना ‘सहकार निवडणूक प्राधिकरणा’ची मान्यता मिळाली आहे. नुकत्याच झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
निवडणुकीसाठी पात्र जिल्हा बँकांच्या प्रारूप याद्या सिद्ध करण्याचे आदेश सहकार विभागाला देण्यात आले असून प्रारूप याद्या सिद्ध करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर चालू आहे. सप्टेंबरमध्ये याद्या सिद्ध होऊन ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम घोषित केला जाईल. कोरोनामुळे जिल्हा बँकेच्या संचालकांना १५ मासांची मुदतवाढ मिळाली होती. आता कोरोनाचा संसर्ग अल्प झाल्यामुळे सहकार विभागाने निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील १२ बँका निवडणुकीसाठी पात्र असून एकाच वेळेस सर्व बँकांच्या निवडणुका घेण्याची सिद्धता प्राधिकरणाने केली आहे.