मुंबई आतंकवादविरोधी पथकाकडून दोघांना अटक !
रत्नागिरीत अवैधरित्या आंतरराष्ट्र्रीय संपर्क केंद्र चालवत असल्याचे प्रकरण
मुंबई – अवैधरित्या आंतरराष्ट्र्रीय संपर्क केंद्र चालवत असल्याच्या संशयावरून रत्नागिरी येथून दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. आतंकवादविरोधी पथकाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. देशविरोधी कारवायांसाठी हे आंतरराष्ट्रीय संपर्क केंद्र चालू होते का, या दृष्टीने पडताळणी केली जात आहे.
‘रत्नागिरीतून आंतरराष्ट्रीय संपर्क होतात’, अशी माहिती मुंबई आतंकवादविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर रत्नागिरी आठवडा बाजार येथील भ्रमणभाष विक्री करणार्या दुकानाचे मालक अलंकार अरविंद विचारे यांना अटक करण्यात आली. त्यांच्या दुकानात संपर्काचा सर्व्हर बसवण्यात आला होता. या सर्व्हरवरूनच आंतरराष्ट्र्रीय संपर्क चालू होेते. यासाठी एका आस्थापनाची जोडणी घेण्यात आली होती. पथकाने माहिती काढलेल्या या आंतरराष्ट्रीय ‘कॉलिंग’साठीचा सर्व्हर रत्नागिरीत आणि ‘कॉलिंग’ सेंटर वांद्रे येथील एका इमारतीत चालू होते. ‘वाईप’द्वारे हे आंतरराष्ट्रीय संपर्क चालू होते. ‘आतंकवादी कारवाया करण्यासाठी नेहमी ही पद्धत वापरली जाते’, असे तज्ञांचे म्हणणे आहे.
या प्रकरणातील सूत्रधार फैजल रज्जाक अली रज्जाक सिद्दीकी (रा. पनवेल, नवी मुंबई) याला रत्नागिरीतील साळवी बस थांब्यावरून अटक केली. अलंकार विचारे आणि फैसल सिद्दीकी या दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.