कल्पकतेने आणि धडाडीने व्यवसाय करतांना देशाप्रती असलेल्या कर्तव्याची जाण ठेवून देशबांधवांना सर्व स्तरांवर आधार देणारे निष्काम कर्मयोगी – कै. सुबोध नवलकर !
‘परात्पर गुरु डॉक्टर आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून त्यांनी माझ्याकडून ‘माझे यजमान ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. सुबोध नवलकर यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये लिहून घ्यावीत’, अशी प्रार्थना करते.
१. जन्म
कै. सुबोध नवलकर यांचा जन्म ८.१२.१९३९ या दिवशी मुंबई येथे झाला. मुंबईचे मूळ रहिवासी असलेल्या पाठारे प्रभु समाजातील श्री. सुंदरराव आणि सौ. लक्ष्मी नवलकर यांचे ते शेंडेफळ (शेवटचे मूल) होते. कै. सुबोध यांना एकूण ८ भावंडे होती.
२. स्वामी समर्थांचे भक्त असलेल्या आई-वडिलांमुळे यजमानांना भक्तीचे बाळकडू मिळणे
यजमानांचे आई-वडील श्री स्वामी समर्थांचे भक्त होते. त्यांचे वडील लहान असतांना स्वतः स्वामींनी त्यांना स्फटिकाच्या पादुका दिल्या होत्या. वडील त्या प्रतिदिन उशाशी घेऊन झोपत असत. ‘टेक्स्टाईल इंजिनीयरींग’चे (अभियांत्रिकीचे) शिक्षण पूर्ण झाल्यावर वडिलांनी स्वत:च्या पहिल्या वेतनातून त्या चांदीने मढवून घेतल्या. नवलकरांच्या आई श्रीमती लक्ष्मी नवलकर या पादुकांची सेवा करायच्या. आईंच्या स्वर्गवासानंतर सुबोध नवलकर पादुकांची सेवा करू लागले. ते प्रतिदिन सोवळे नेसूनच देवपूजा करायचे आणि प्रत्येक गुरुवारी पादुकांना अभिषेक करायचे. त्यानंतर भगवान सूर्यनारायणाला नियमित अर्घ्य द्यायचे. अर्घ्य देण्याचा हा नेम त्यांनी शेवटपर्यंत पाळला. ते प्रतिदिन १२ सूर्यनामांचा जप करायचे. आमच्या घरी श्रावणातील, तसेच श्री गणेशोत्सव, नवरात्र आणि चातुर्मासातील कुलाचार यांचे पालन व्हायचे.
३. लहानपणापासून धर्माभिमानी असलेले सुबोध नवलकर !
३ अ. ख्रिस्ती शिक्षिकेने गुडघ्यावर बसून प्रार्थना करायला सांगितल्यावर त्याला विरोध करून ती शाळा सोडून रात्रशाळेत प्रवेश घेऊन शिक्षण घेणे : यजमानांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले होते. ते १० वीला असतांना त्यांच्या ख्रिस्ती शिक्षिकेने सर्वांना गुडघ्यावर बसून प्रार्थना करायला सांगितली. तेव्हा त्यांनी त्याला विरोध केला आणि त्या शाळेतून स्वतःचे नाव काढले. नंतर परीक्षेच्या वेळी त्यांना रात्रशाळेत प्रवेश घ्यावा लागला; कारण दुसर्या शाळा त्यांना मध्येच प्रवेश द्यायला सिद्ध नव्हत्या. अशा प्रकारे त्यांनी त्यांचे ‘मॅट्रीक’पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील के.सी. महाविद्यालयातून ‘बी.ए.’ची पदवी घेतली.
४. कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागात ‘गाईड ट्रेनिंग’ अधिकार्याची नोकरी करणे
सुबोध यांनी शिक्षण घेत असतांनाच त्यांच्या मोठ्या मेहुण्यांच्या यात्रा आस्थापनाच्या माध्यमातून पर्यटक घेऊन जायला आरंभ केला. सुबोध ३ वर्षांचे असतानांच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते, त्यामुळे कुटुंबाचा सर्व भार मोठ्या २ भावांवर पडला होता. याची जाणीव ठेवून सुबोधनी कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी स्वतः काम करायला आरंभ केला. हळूहळू यात्रा आस्थापनाच्या कामात त्यांचे बस्तान बसू लागले. त्याच वेळी त्यांना महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागात ‘गाईड ट्रेनिंग’ अधिकार्याची नोकरी मिळाली. त्या वेळी त्यांना प्रतिष्ठित विदेशी पाहुण्यांना प्रेक्षणीय स्थळी घेऊन जाण्याची संधी मिळायची. त्यामध्ये इतर देशांचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान इत्यादी सन्माननीय पाहुणे असायचे; परंतु त्यांना त्यात रस नव्हता.
५. नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करण्याची आवड असणे आणि नवनवीन गोष्टींचा कल्पकतेने वापर करून धडाडीने व्यवसाय करणे
त्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा होता; म्हणून त्यांनी ‘युनिटुर्स ऑफ इंडिया’ या नावाने स्वतःचे यात्रा आस्थापन चालू केले. त्यांना नवनवीन प्रयोग करायला आवडायचे. त्यांनी शाळा, कॉर्पाेरेट कार्यालये, अधिकोष इत्यादींच्या केवळ त्या त्या क्षेत्रातील पर्यटकांच्या स्वतंत्र यात्रा चालू केल्या आणि त्यात ते यशस्वी झाले. पुढे त्यांच्या आस्थापनाने ‘जपान एक्सपो ७०’ ला भारतातून पहिली यात्रा नेली. त्याचप्रमाणे ‘एअर इंडिया’च्या पहिल्या ‘जम्बो फ्लाईट’वर त्यांचा चमू युरोपला गेला होता. अशा त्यांना नवनवीन गोष्टी करण्याची आवड होती. ते नेहमी म्हणायचे, ‘‘केवळ गुजराथी आणि मारवाडी लोकांनीच का उद्योग-व्यवसाय करायचे ? मराठी माणसांनीही मागे न रहाता आणि केवळ नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय करायला पाहिजे.’’ त्यांच्यामध्ये तशी तडफही होती.
६. व्यवसायात विशेषत्वाने केलेले गौरवास्पद कार्य !
६ अ. निर्यातक्षेत्रात पाऊल टाकून त्यातही अवैध मार्गाने व्यवसाय करणार्यांवर चाप बसवणे
६ अ १. प्रथम भाज्या, मसाले आणि बांधकाम साहित्य निर्यात करणे, नंतर विदेशात मनुष्यबळही पाठवण्यास आरंभ करणे, ते पाठवतांना संबंधितांना सर्वतोपरी साहाय्यही करणे : वर्ष १९७५ पासून त्यांनी निर्यात क्षेत्रात पाऊल ठेवले. आरंभी भाज्या, मसाले, बांधकाम साहित्य निर्यात करता करता आखाती देशांत लागणारे मनुष्यबळही पाठवणे चालू केले. त्यासाठी त्यांनी आवश्यक असणार्या अनुमत्या आणि परवानेही (‘लायसेन्स’) काढले. त्यांनी श्रमिकांपासून ते अभियंते, आधुनिक वैद्य इत्यादींना मोठ्या प्रमाणात विदेशात नोकर्या मिळवून दिल्या. त्यांनी या सर्वांना नुसतेच तिकडे पाठवले नाही, तर ‘तेथे त्यांची उत्तम व्यवस्था होत आहे ना ?’, याकडेही लक्ष दिले.
६ अ २. अवैध मार्गाने श्रमिकांना विदेशात पाठवणार्यांवर वचक बसवणे, त्या समवेत पारपत्र आणि ‘इमिग्रेशन’ कार्यालय येथे भ्रष्टाचार करणार्यांवरही वचक बसवणे : त्यांनी अशा आस्थापनांचे एक ‘असोसिएशन’ (इंडियन मॅनपावर एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल) बनवले. पुढे बरीच वर्षे ते त्याचे अध्यक्ष होते. त्या कालावधीत त्यांनी लोकांना अवैध प्रकारे आखाती देशांत नोकरीला पाठवणार्या मध्यस्थांवर चांगलाच वचक बसवला. त्याच समवेत पारपत्र आणि ‘इमिग्रेशन’ कार्यालय येथे चालणार्या भ्रष्टाचारालाही चांगलाच चाप लावला. त्यामुळे नोकरीसाठी विदेशांत जाणार्या लोकांच्या सुरक्षिततेत वाढ झाली. त्यांनी वर्ष १९८३ चा ‘इमिग्रेशन ॲक्ट’ पालटण्यासाठी श्रमिक मंत्रालय आणि विदेश मंत्रालय यांच्याशी पत्रव्यवहारासह प्रत्यक्ष भेटून पालट करवून घेतले. त्यामुळे भारतियांची आखाती देशात नोकरीसाठी जाण्याची सुरक्षितता वाढली.
६ आ. ‘विदेशात नोकरीसाठी जाणार्या श्रमिकांमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला कसा लाभ होतो ?’, ते अर्थमंत्र्यांना सोदाहरण पटवून देऊन श्रमिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळवून देणे : त्यांनी त्या वेळच्या अर्थमंत्र्यांना भेटून ‘विदेशात नोकरी करणार्या भारतीय श्रमिकांचा विदेशी चलनाच्या माध्यमातून आपल्या अर्थव्यवस्थेत किती मोलाचा वाटा आहे ?’, हे गणित मांडून दाखवले. भारतीय श्रमिक विदेशी चलन मिळवतो आणि विदेशात फिरायला जाणारे पैसे व्यय करतात. त्यामुळे त्यांनी भारतीय श्रमिकांसाठी ‘कस्टम’ आणि अन्य सोयींमध्ये विशेष सुविधा मिळवून दिल्या. आजही त्याचा लाभ सर्वांना मिळत आहे.
६ इ. सर्व देशांतील मनुष्यबळ पाठवणार्या आस्थापनांचे संघटन करणे : वर्ष १९९० च्या आसपास ते ‘सार्क रिजन’चे आणि ‘आशियायी रिजन’चेही उपाध्यक्ष होते. त्या वेळी त्यांनी आपल्या देशातून आखाती देशांत कामासाठी जाणार्या लोकांना अनेक सुविधा आणि सुरक्षितता मिळावी, यांसाठी पुष्कळ प्रयत्न केले. त्यांनी सर्व देशांतील मनुष्यबळ पाठवणार्या आस्थापनांचे संघटन केले. त्या वेळी ते आवश्यकतेनुसार त्या सर्व सभासदांशी दूरभाषद्वारे ‘कॉन्फरन्स’च्या माध्यमातून संवाद साधत असत. त्यामुळे एकाच वेळी सर्वत्र आवश्यक ते निर्णय आणि उपाययोजना तात्काळ पोचत असे.
६ ई. इराक – कुवेत युद्धकाळात भारतियांच्या सुरक्षेसाठी केलेले कौतुकास्पद प्रयत्न !
६ ई १. इराक आणि कुवेत यांच्यामधील युद्धाच्या वेळी तिथे अडकलेल्या भारतियांची सुटका करण्यासाठी केलेले अभिमानास्पद प्रयत्न ! : ऑगस्ट १९९० मध्ये इराकने कुवेतवर आक्रमण केले. त्या वेळी सहस्रो भारतीय कुवेत आणि इराक येथे अडकले होते. त्या वेळी नवलकरांनी पुढाकार घेऊन त्या वेळचे पंतप्रधान आय.के. गुजराल, विदेशमंत्री नटवरसिंह आणि श्रममंत्री पी.ए. संगमा यांना संपर्क करून ‘प्रथम आपण आपल्या लोकांना भारतात सुखरूप घेऊन यावे’, यासाठी त्यांचा पाठपुरावा केला. त्यासाठी त्यांनी रात्रंदिवस अथक प्रयत्न केले आणि त्यात त्यांना यश मिळाले. त्यांनी ‘एअर इंडिया’ आणि ‘इंडियन एअर लाईन्स’ची रिकामी विमाने भारतातून तिकडे पाठवून तेथील भारतियांना परत आणले.
६ ई २. इराक आणि कुवेत येथे अडकलेल्या लोकांच्या नातेवाइकांना पत्रकार परिषदा घेऊन आश्वस्त करणे, जगभरातील वर्तमानपत्रांनी त्यांच्या या कार्याला विशेष प्रसिद्धी देणे : त्यांनी कुवेत येथील भारतियांना आवाहन केले, ‘तुम्ही प्रथम भारतात परत या. तुमचे वैयक्तिक साहित्य आणि अधिकोषातील ठेवी यांची चिंता करू नका. आपण ते मिळवण्यासाठी प्रयत्न करूया.’ त्यासाठी त्यांनी ‘कुवेत रिलिफ सेल’, (Kuwait Relief Cell) ची स्थापना केली. त्यांच्या या आवाहनाला आणि उपक्रमाला जगभरातील ३५०० वर्तमानपत्रांनी प्रसिद्धी दिली. त्या वेळी त्यांचे विचार आणि वार्ता सर्व प्रमुख वर्तमानपत्रे आणि मासिके यांत छापून येत होत्या. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अडकलेल्या सर्व लोकांच्या नातेवाइकांना आश्वस्त केले. त्या वेळी त्यांना लोकांचे दूरभाष येत होते आणि त्यांना साहाय्य केले जात होते.
६ ई ३. मृत झालेल्या भारतियांचे मृतदेह परत आणण्याचे किचकट कार्यही मोठ्या धाडसाने करणे : या कालावधीत त्यांनी कुवेतमध्ये मृत्यू झालेल्या भारतीय लोकांचे मृतदेह आणण्याचे मोठे धाडसाचे आणि किचकट कामही केले. त्यासाठी लागणार्या अनुमत्या काढून त्यांनी ते मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केले. मुंबईत परत आलेल्या रुग्ण लोकांसाठी त्यांनी नानावटी आणि आशा पारेख रुग्णालयांत औषधोपचारांची सोय केली. त्याचप्रमाणे त्यांना त्यांच्या मूळ गावी जाता येण्यासाठी त्यांनी परिवहन मंडळाच्या अधिकार्यांना भेटून विशेष अनुमती घेतली. रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना पत्र लिहिले. अशा प्रकारे त्यांनी त्या लोकांसाठी ‘एस्.टी.’ आणि रेल्वेची विनामूल्य व्यवस्था केली. ‘त्यांनी कुवेत युद्धाच्या आपत्काळात योग्य आणि धाडसी निर्णय घेतले अन् शासनाचे साहाय्य घेऊन मोलाचे कार्य केले’, हे खरेच पुष्कळ कौतुकास्पद आहे.
७. कुठल्याही पारतोषिकाची अपेक्षा नसलेले निष्काम कर्मयोगी !
७ अ. ‘देशाप्रती आणि देशबांधवांप्रती असलेले उत्तरदायित्व निभावण्यासाठी काम केले’, असे सांगून नम्रपणे पारितोषिक नाकारणारे नवलकर !
१. त्यांच्या या कार्याचा विचार राष्ट्रपती भवनातून झाला आणि त्या वेळचे राष्ट्रपती ग्यानी झैलसिंह यांनी त्यांना ‘पीस ऑफ हार्मनी’ हा सन्मान देऊ केला; परंतु नवलकरांनी तो नम्रतेने नाकारतांना सांगितले, ‘‘मला पारितोषिक (‘अवॉर्ड’) नको. हे सर्व मी माझे देशाप्रतीचे आणि माझ्या पदाचे उत्तरदायित्व समजून माझ्या देशबांधवांसाठी केले !’’ त्या वेळी मला त्यांचा अभिमान वाटला.
२. त्याच वेळी महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट’ या पदाचा अधिकार देऊन त्यांच्या नावाचा शिक्का बनवून घरी पाठवला होता. तोही त्यांनी साभार परत केला.
यावरून त्यांचा निष्काम भाव लक्षात येतो.
७ आ. ‘लोकांचे आशीर्वाद हेच खरे पारितोषिक !’, असे मानणारे निःस्पृह नवलकर ! : त्यांच्या या कार्याच्या वार्ता सर्व भारतीय भाषांमधून येत होत्या. काही जणांच्या कुटुंबियांनी आम्हाला आभारपत्रे पाठवली, तर काही माता-भगिनींनी आमच्यासाठी पूजा आणि अभिषेक करून प्रसाद पाठवले. त्या वेळी समष्टी सेवेचे महत्त्व आणि त्यांचे प्रेम आम्हाला अनुभवायला मिळाले. त्या वेळी नवलकर म्हणाले, ‘‘लोकांचे आशीर्वाद हेच माझे खरे पारितोषिक ! या पीडित लोकांना मी साहाय्य करू शकलो. देवाने मला ही संधी दिली, हीच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे.’’
७ इ. खास सणानिमित्त आलेल्या भेटीही नम्रतेने परत पाठवणे : त्यांच्या पदामुळे आम्हाला दिवाळी आणि इंग्रजी नववर्षानिमित्त काही आस्थापनांकडून भेटी येत. काही वेळा ते त्या भेटी परत पाठवत, तर काही वेळा त्यात भर घालून आमच्याकडून परतभेट म्हणून त्यांना पाठवत असत. (क्रमश: उद्याच्या अंकात)
– श्रीमती स्मिता नवलकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन आश्रम, देवद पनवेल. (२९.११.२०२०)