७५ व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदी यांची पाक आणि चीन यांना चेतावणी !
हा नवा भारत असल्याने कठोर निर्णय घेऊ शकतो !
नवी देहली – सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करून देशाने त्याच्या शत्रूंना ‘हा नवीन भारत आहे’, हे दाखवून दिले आहे. साम्राज्यवादाचे कुटील स्वप्न बागळणार्यांनाही भारताने चेतावणी देत ‘भारत कठोर निर्णय घेऊ शकतो’, हा संदेश दिला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केल्यानंतर देशाला संबोधित करतांना केले.
पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनातील काही महत्त्वाची सूत्रे
१. संरक्षण क्षेत्रात भारत स्वावलंबी होत आहे. संरक्षण क्षेत्रात देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी, भारतीय आस्थापनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आमच्या उद्योजकांना नवीन संधी देण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. देशाच्या संरक्षणार्थ सिद्ध असलेल्या सैन्याचे हात सशक्त करण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही. स्वदेशी विमानवाहू नौका ‘विक्रांत’ची समुद्रात चाचणी चालू आहे. आज भारत आपले लढाऊ विमान विकसित करत आहे. पाणबुडी बनवत आहे.
२. कोरोनाच्या काळातील भारताचे प्रयत्न जगाने पाहिले आणि कौतुक केले आहे. आज जग भारताकडे नव्या दृष्टीकोनातून पहात आहे. आपल्या शास्त्रज्ञांनी भारताला लस विकसित करून दिली. आज आपल्याला लसीसाठी कुणावर अवलंबून रहावे लागले नाही.
३. पर्यावरण संरक्षण आणि हवामान पालट यांच्या पार्श्वभूमीवर मी ‘नॅशनल हायड्रोजन मिशन’ची घोषणा करतो. भारताला ‘ग्रीन हायड्रोजन’चे केंद्र (हब) बनवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. पर्यावरण संरक्षणासाठी देशातील रेल्वे वाहतूक १०० टक्के विजेवर चालवण्यासाठी काम चालू आहे. वर्ष २०३० पर्यंत हे लक्ष्य पूर्ण केले जाईल.
४. आगामी काळात ‘पंतप्रधान गतीशक्ती राष्ट्रीय योजने’नुसार १०० लाख कोटींहून अधिक रुपयांच्या योजनांच्या माध्यमांतून तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. ही अशी योजना आहे, ज्यामुळे समग्र पायाभूत सुविधेचा पाया रचला जाईल.
५. नव्या ‘वंदे भारत’ रेल्वे गाड्या देशाच्या कानाकोपर्याला जोडतील.
६. जम्मू-काश्मीरमध्येही विधानसभा निवडणुकीची सिद्धता केली जात आहे. लडाखमध्ये आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. ‘सिंधु सेंट्रल युनिव्हर्सिटी’मुळे लडाख उच्च शिक्षणाचे केंद्र बनणार आहे.
७. हा केवळ ७५ वर्षांच्या स्वातंत्र्याचा समारंभ नाही, तर आता परिश्रमांची पराकाष्ठा करण्याची वेळ आहे. देशाच्या विकासासाठी आपल्याला काम करायचे आहे. आपल्याला असा आधुनिक भारत बनवायचा आहे जिथे सर्व नागरिकांना अत्याधुनिक सुविधा असतील.
८. सर्व सैनिकी शाळांची कवाडे आता मुलींसाठीही उघडण्यात येतील. देशात सध्या ३३ सैनिकी शाळा आहेत.
‘ग्रीन हायड्रोजन’ म्हणजे काय ?‘फोर्ब्स’ या अमेरिकी संकेतस्थळानुसार सध्या विविध कारखान्यांमध्ये वापरण्यात येणारे हायड्रोजन हे ‘ग्रे हायड्रोजन’ या नावाने प्रचलित आहे. या हायड्रोजनचे उत्पादन करतांना उत्पादित हायड्रोजनच्या ९ पटींनी हानीकारक अशा ‘कार्बन डायऑक्साईड’ची निर्मिती होते. या हायड्रोजनच्या निर्मितीमुळे प्रदूषण वाढते. यावर उपाय म्हणून सिद्ध झालेले कार्बन डायऑक्साईड पृथ्वीत खोल पुरण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. ही प्रक्रिया वापरून सिद्ध केलेल्या हायड्रोजनला ‘ब्लू हायड्रोजन’ म्हटले जाते. तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन (प्राणवायू) यांचे एकत्रीकरण करून पाणी बनते. ‘इलेक्ट्रोलिसिस’ या पद्धतीद्वारे पाण्यातील हायड्रोजनला प्राणवायूपासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याने कोणतेच प्रदूषण न होता हायड्रोजनचे उत्पादन करणे शक्य होते. त्यामुळे यास ‘ग्रीन हायड्रोजन’ म्हणतात. सध्याच्या घडीला याचे मूल्य पुष्कळ अधिक आहे. याचा उपयोग अमोनिया, रासायनिक खत, तसेच पेट्रोलपासून बनवण्यात येणारी अन्य रसायने यांच्या उत्पादनासाठी केला जातो. |