अपरिचित क्रांतीकारक !
इतिहास जाणा, राष्ट्राभिमान जोपासा !
भगतसिंह, सुखदेव, राजगुरु यांच्या प्रमाणेच देशात सहस्रावधी क्रांतीकारक होऊन गेले, त्यांनी क्रांतीची मशाल प्रज्वलित ठेवली, अशा अपरिचित क्रांतीकारकांची या लेखातून माहिती घेऊन स्वराज्याचे सुराज्य (हिंदु राष्ट्र) करण्यासाठी कृतीशील होऊया !
क्रांतीकारक शंकर महाले
९ ते ११ ऑगस्ट १९४२ असे ३ दिवस नागपूरमधील आंदोलकांनी हरताळ पाळून सभा घेतल्या. शासकीय कार्यालये अन् पोलीस चौक्या यांवर मोर्चे काढले आणि चौक्या जाळल्या. त्यामध्ये क्रांतीकारक शंकर महाले यांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे १७ वर्षांच्या महाले यांना फाशी देण्यात आली.
बालक्रांतीविरांगना सुनीती चौधरी आणि शांती घोष
१४ डिसेंबर १९३१ या दिवशी शांती घोष आणि सुनीती चौधरी या १३ वर्षांच्या दोघी मैत्रिणी अन्यायी न्यायदंडाधिकारी स्टीवन्स याला शाळेच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याचे निमित्त साधून त्याच्या कार्यालयात गेल्या. त्यांनी दिलेल्या निमंत्रणपत्रिकेवर दृष्टी टाकण्यासाठी स्टीवन्स याने मान खाली करताच दोघींनीही त्याच्यावर गोळ्या झाडून त्याला ठार मारले. दोघींना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली गेली.
क्रांतीकारक शिरीषकुमार मेहता
नंदूरबार (महाराष्ट्र) येथे ९ सप्टेंबर १९४२ या दिवशी तिरंगा यात्रेला इंग्रजांनी विरोध केला. लाठीमार करत बंदुकाही रोखल्या होत्या. या यात्रेमध्ये १६ वर्षीय शिरीषकुमार मेहता हाही सहभागी झाला होता. इंग्रजांनी बंदुका रोखल्याचे पाहून ‘जर गोळीबार करायचा असेल, तर माझ्यावर प्रथम करा’, असे सांगत हातात तिरंगा फडकावत शिरीषकुमार त्यांच्या समोर उभा राहिला. यामुळे संतप्त झालेल्या निर्दयी इंग्रज पोलिसांनी त्याच्यावर ४ गोळ्या झाडल्या. यात शिरीषकुमार हुतात्मा झाला.
क्रांतीकारक सुशील सेन
२६ ऑगस्ट १९०७ ला कोलकाता न्यायालयात अरविंद घोष यांच्यावर खटला चालू असतांना बाहेर जमलेले देशभक्त ‘वन्दे मातरम्’च्या घोषणा देत होते. त्या देशभक्तांवर इंग्रज शिपाई अंदाधुंद लाठीमार करू लागले. १५ वर्षांच्या सुशील सेन याला ते पहावले नाही. त्याने एका धिप्पाड इंग्रज शिपायाला हातानेच २-३ तडाखे लगावले ! बाकीच्या शिपायांनी सुशीलला घेरले व रक्तबंबाळ होईपर्यंत मारले. दुसर्या दिवशी न्यायालयाने सुशीलला १५ फटक्यांची शिक्षा दिली. सुशीलने धीरोदात्तपणे ती भोगली !