प्रखर राष्ट्राभिमान असणार्यांचा आदर्श समोर ठेवा !
छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे, महाराणा प्रताप, पहिला बाजीराव यांसारखे धर्मनिष्ठ राजे, योद्धे आणि असंख्य राष्ट्रप्रेमी क्रांतीकारक यांनी दिलेल्या क्रांतीलढ्यामुळे आज आपण स्वतंत्र भारतात सुरक्षित जीवन जगू शकतो. स्वातंत्र्यपूर्वकाळात क्रांतीकारकांनी सशस्त्र आणि अत्याचारी राज्यकर्ते असलेल्या इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले. कित्येक क्रांतीकारकांमध्ये लहानपणापासूनच राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित होती.
१९१८ ची गोष्ट. पंजाबमधील उधमसिंह अवघा १९ वर्षांचा होता. त्या वेळी तो जालियनवाला बागेतील सभेत भाषण ऐकण्यासाठी गेला होता. सभेला सहस्रो राष्ट्रप्रेमी एकत्र जमले होते. सभा चालू झाली आणि अचानक इंग्रज अधिकारी जनरल डायरने सैनिकांना गोळीबाराचे आदेश दिले. पटांगणाला चारही बाजूंनी भिंती होत्या. भारतियांनी अशा प्रकारे एकत्र येऊन क्रांती करू नये, या दुष्ट हेतूने डायरने २ सहस्र भारतियांचा केलेला भयंकर नरसंहार उधमसिंहने त्याच्या डोळ्यांनी पाहिला आणि हृदयात प्रतिशोधाची अखंड ज्योत तेवत ठेवली. तब्बल २० वर्षांनंतर इंग्लंडमध्ये जाऊन त्याने ओडवायर या इंग्रजी अधिकार्याचा वध केला. भगतसिंहांप्रमाणे सरदार उधमसिंहांनी हसत हसत फासाला कवटाळले.
राष्ट्रीय दिनांच्या दिवशी आपण शाळेत किंवा आपल्या इमारतीमध्ये क्रांतीकारकांच्या जीवनावरील प्रवचने, व्याखाने, वक्तृत्व किंवा निबंध स्पर्धा यांचे आयोजन करून त्यांचे स्मरण करू शकतो. आपले पालक किंवा शिक्षक यांच्यासमवेत राष्ट्रपुरुष किंवा क्रांतीकारक यांची जन्मस्थळे, स्मारके यांना भेट देऊ शकतो. क्रांतीकारकांची माहिती सांगणारे प्रदर्शनही उपलब्ध आहे. ते लावू शकतो. राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांचे स्मृतीदिन साजरे करू शकतो, तसेच राष्ट्राभिमानी व्यक्तीमत्त्वांचे मार्गदर्शन किंवा अनुभवकथन आयोजित करू शकतो.