‘आध्यात्मिकदृष्ट्या स्वतंत्र होणे’ आणि ‘कर्माचे महत्त्व’ यांविषयी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केलेले मार्गदर्शन !

‘१५.८.२०२० या दिवशी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केलेल्या मार्गदर्शनातून मला शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

१. आध्यात्मिकदृष्ट्या स्वतंत्र होणे

१ अ. आध्यात्मिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी ईश्वर आणि गुरु यांच्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याचा प्रयत्न करावा ! : ‘१५ ऑगस्ट हा दिनांकानुसार भारताचा स्वातंत्र्यदिन आहे. आपण स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही सुराज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. स्वातंत्र्यविरांनी देशप्रेम आणि राष्ट्रभक्ती यांसाठी पुष्कळ त्याग केला होता. वास्तवात साधकाला ‘आपण आध्यात्मिकदृष्ट्या खरंच स्वतंत्र आहोत’, असे वाटते का ? आध्यात्मिक स्तरावर पाहिले, तर आपण आपले संस्कार, इंद्रिये, आपले स्वभावदोष आणि अहं यांचे गुलाम आहोत. आपण स्वतःला ‘स्व’तंत्र करण्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला आहे का ? ईश्वर किंवा परात्पर गुरुदेव यांच्या प्रतीचे प्रेम, ईश्वर किंवा गुरुभक्ती यांच्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याचा आपण प्रयत्न केला आहे का ?

सौ. सानिका सिंह

१ आ. अंतर्गत स्वतंत्रतेसाठी संघर्ष करून श्री गुरूंच्या इच्छेनुसार आचरण करावे ! : साधनेच्या दृष्टीने ‘स्व’तंत्र म्हणजे ‘स्व’स्वरूपाचे ज्ञान होणे होय ! आपले ‘स्व’स्वरूप हे ईश्वरस्वरूप, म्हणजे चैतन्य किंवा आत्मा हा ब्रह्मस्वरूप असतो. खर्‍या अर्थाने ‘स्व’ आणि ‘तंत्र’, म्हणजे आपले आत्मतंत्र किंवा ईश्वरी तंत्र होय. याचाच अर्थ आपले स्वभावदोष आणि अहं यांपासून मुक्त होऊन ‘ईशबुद्धीच सर्वश्रेष्ठ आहे’, याचे ज्ञान होऊन त्यानुसार धर्माचरण किंवा धर्मरक्षणाची कृती करावी. देश बाह्यतः स्वतंत्र झाला आहे. आपण ‘स्व’तंत्र केव्हा होणार ? जेव्हा आपले आचरण श्री गुरूंच्या इच्छेनेच होईल, तेव्हा आपण खर्‍या अर्थाने ‘स्व’तंत्र होऊ. त्यामुळे आपल्याला आपल्या अंतर्मनानेच अंतर्गत स्वतंत्रतेसाठी एक संघर्ष करावा लागेल. सर्वसामान्य मनुष्य तीर्थक्षेत्री जाऊन स्वत:चे पाप धुतो. साधकासाठी सर्व तीर्थक्षेत्रे गुरुचरणीच असतात. गुरुचरणांची सेवाच सर्व तीर्थांचे फळ देणारी असते. साधनाच त्याला पाप आणि पुण्य यांतून मुक्त करून मोक्ष प्रदान करते.

१ इ. प्रत्येक कर्म करतांना ‘आपण खर्‍या स्वातंत्र्याच्या दिशेने जात आहोत ना ?’, याचे चिंतन करायला हवे ! : प्रत्येक साधकाने ईश्वरेच्छेने जीवन व्यतीत करतांना (प्रत्येक कर्म करतांना) आत्मबुद्धी जागृत करून ‘आपण खर्‍या स्वातंत्र्याच्या दिशेने जात आहोत ना ?’, याचे चिंतन निरंतर करायला पाहिजे. प्रत्येक कर्म करतांना ‘स्वभावदोष, अहंकार आणि कर्तेपणा यांपासून आपण मुक्त आहोत का ? कोणताही पूर्वग्रह किंवा स्वभावदोष यांपासून आपण स्वत:च्या इच्छेने मुक्त होऊ शकतो का ? कुणाचा क्रोध आल्यास आपण त्यावर स्वत:च्या इच्छेने नियंत्रण ठेवू शकतो का ? कुणीही आपल्याला आपली चूक सांगितल्यावर आपल्याला जे दुःख होते किंवा प्रतिक्रिया येते, ती आपण आपल्या इच्छेने रोखू शकतो का ?’, याचे चिंतन करायला हवे.

१ इ १. आपल्या कर्माचे चिंतन कसे करावे ? : कर्म करतांना ईश्वराशी अनुसंधान ठेवून ‘कर्ते-करविते गुरुदेवच (साक्षात् ईश्वरच) आहेत’, हा भाव ठेवून आपण कर्म करतो का ?’, याचे चिंतन करायला पाहिजे.

२. अनुसंधान ठेवून भावपूर्ण कर्म करणे

आपण नामजप करत कर्म करतो, तेव्हा ते कर्म अकर्म होते. वैयक्तिक कर्म करतांना मनात नामजप चालू असायला हवा आणि समष्टी कर्म करतांना ‘योग्य चिंतन, अभ्यास, भावपूर्ण अन् परिपूर्ण कर्म’ हेच अनुसंधान किंवा नामस्मरणाप्रमाणे असते.

३. स्वेच्छेचा त्याग करून कर्म करणे

आपण अपेक्षा, स्वार्थ किंवा स्वेच्छा ठेवून कर्म केले, तर त्यातून आपल्याला कदापि ईश्वरप्राप्ती होणार नाही; कारण अपेक्षा, स्वेच्छा आणि स्वार्थ हे तमोगुणी आहेत. तमोगुणी उद्देश ठेवून आपण कर्म केले, तर त्याचे फळ सत्त्वगुणी कसे असेल ? त्यामुळे ‘कर्म करतांना आपण स्वेच्छादींचा त्याग करण्याचा प्रयत्न केला का ?’, याचा विचार करायला पाहिजे.

४. कर्माचा आढावा देणे 

४ अ. आपण आढावा देतांना प्रत्येक कर्मातून झालेल्या कार्याचाच आढावा देत असतो; परंतु ‘प्रत्येक कर्मातून साधना झाली का ?’, याचाही आढावा घेतला पाहिजे.

४ आ. कर्म करतांना स्वभावदोषांवर केलेली मात आणि गुणांची वृद्धी यांचा आढावा देणे : कार्याचा आढावा देतांना ‘ते परिपूर्ण झाले का ?’, हे सांगावे. ‘कर्म करतांना मी कोणत्या स्वभावदोषांवर मात केली किंवा कोणत्या स्वभावदोषांवर मात करू शकलो नाही ? मी कोणत्या गुणाची वृद्धी केली किंवा करू शकलो नाही आणि कर्तेपणाचा त्याग करू शकलो का ?’, असा मनाचा आढावा सांगावा.

४ इ. आढाव्याच्या माध्यमातून गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करणे : ‘आढाव्याच्या माध्यमातून परात्पर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे’, असा भाव होता का किंवा तसा प्रयत्न केला का ?’, याचे चिंतन करायला हवे.

४ ई. आपल्यामध्ये ज्या उणिवा आहेत, त्या समजून घेऊन त्यांच्याविषयी आपल्या आढाव्यात सांगितले पाहिजे.

५. कर्माचे श्रेष्ठत्व

५ अ. सर्व योगमार्गांसाठी कर्म महत्त्वपूर्ण असणे : भक्ती, ज्ञान किंवा कोणताही योग असो, सर्व योगमार्गांसाठी कर्म महत्त्वपूर्ण आहे. कर्माला कर्मयोगात परिवर्तित करता आले पाहिजे. कर्मयोग म्हणजे कर्माच्या माध्यमातून ईश्वराशी योग, म्हणजेच ‘कर्म करतांना ईश्वराशी जोडले जाणे’ आवश्यक आहे. त्यासाठी भावभक्ती वाढवली पाहिजे. हठयोग असो, ज्ञानप्राप्ती करायची असो, भक्ती करायची असो किंवा कोणतेही कर्म करायचे असो, त्यासाठी प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजेत.

५ आ. कर्म कसे करावे ? : साधकाने निष्काम कर्मच करायला पाहिजे. निष्काम कर्म, म्हणजे स्वेच्छाविरहित, निःस्वार्थी किंवा पारमार्थिक उद्देशाने केलेले कर्म होय. कर्म करतांना ‘मी परात्पर गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) आज्ञापालन म्हणून किंवा ईश्वरप्राप्तीसाठी हे कर्म करत आहे’, असा भाव ठेवायला हवा. हे निष्काम कर्मच आहे.

५ इ. कर्मच कार्यप्राप्ती आणि ईश्वरप्राप्ती करवून देत असणे : कर्मच आपल्याला कार्यप्राप्ती आणि ईश्वरप्राप्ती करवून देते. त्यामुळे कर्म करतांना ईश्वरी अनुसंधान आवश्यक आहे. मग ते कर्म भक्तीशी संबंधित असो, ज्ञानाशी संबंधित असो, हठयोग किंवा अन्य कोणत्या साधनामार्गाशी संबंधित असो ! असे कर्म साधनेसाठी आवश्यक असून त्याचे महत्त्व ९८ टक्के आहे.

सद्गुरु पिंगळेकाकांच्या या मार्गदर्शनानंतर माझ्या मनात ‘साधनेच्या २० वर्षांत मी अशा प्रकारे कर्म करण्याचे प्रयत्नच केले नाहीत’, असा विचार आला आणि मला पश्चात्ताप झाला. ‘परात्पर गुरुदेव, मी हे करू शकत नाही. स्वभावदोष आणि अहं यांनी भरलेल्या या जिवाकडून आपणच अशा प्रकारे साधना करवून घेऊ शकता. मी पूर्णतः असाहाय्य आहे. मी आपल्या चरणी शरणागत आहे. आता आपणच कृपा करावी.’

‘परात्पर गुरुदेव आणि सद्गुरु काका, ‘आपल्याच कृपेने हे सर्व शब्दबद्ध होऊ शकले’, यासाठी मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. सानिका सिंह, वाराणसी सेवाकेंद्र, उत्तरप्रदेश.

(१९.८.२०२०)