कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि भाजप पदाधिकारी यांच्यात खडाजंगी !
जिल्हाधिकार्यांकडून माध्यम प्रतिनिधींना छायाचित्र काढण्यास मज्जाव
कोल्हापूर, १४ ऑगस्ट – छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील परिचारकांच्या स्थानांतरणासह मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी भाजप पदाधिकारी निवेदन देण्यासाठी १३ ऑगस्ट या दिवशी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे गेले होते. निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या दालनात गेल्यावर केवळ ५ व्यक्तींनी कार्यालयात यावे, असे सांगून जिल्हाधिकार्यांनी माध्यम प्रतिनिधींना छायाचित्र काढण्यास मज्जाव केला. यामुळे भाजप कार्यकर्ते याचा निषेध करत दालनाबाहेर आले आणि त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यानंतर जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी बाहेर आले. या वेळी कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि भाजप पदाधिकारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी या वेळी जिल्हाधिकारी यांच्या समोरच घोषणाबाजी केली त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे निवेदन न स्वीकारताच त्यांच्या दालनात निघून गेले. यामुळे संतप्त झालेल्या भाजप पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनाच्या बाहेरच निवेदन चिकटवले. या संदर्भात भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव म्हणाले, कोरोनाचे नियम हे केवळ भाजपच्या कार्यकर्त्यांनाच आहेत का ? इतर संघटनांचे ४०-५० कार्यकर्ते येथे येऊन बसतात तेव्हा जिल्हाधिकारी यांना कोरोनाचे नियम आठवत नाहीत का ? जिल्हाधिकारी दालनात निवेदन न स्वीकारून जिल्हाधिकारी यांनी भाजप शिष्टमंडळाचा अवमान केला आहे. जिल्हाधिकारी वृत्तपत्र छायाचित्रकाराचा छायाचित्रक संच जप्त करण्याच्या सूचना देत आहेत. इतर पक्षाचे निवेदन, बैठक, छायाचित्रण जिल्हाधिकारी यांना कशी चालते ? त्यांची ही कृती निषेधार्थ आहे.