राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी मुंबईमध्ये हिंदु जनजागृती समितीकडून पोलीस ठाण्यांत तक्रारी प्रविष्ट !
राष्ट्रध्वज छापलेले ‘टी-शर्ट’ विकले जात असूनही कारवाई करण्यास पोलीस उदासीन !
राष्ट्रध्वज छापलेले ‘टी-शर्ट’ आणि ‘मास्क’ यांच्या माध्यमांतून राष्ट्रध्वजाचा होत असलेला अनादर रोखण्यासाठीची प्रशासनाची उदासीनता लज्जास्पद ! – संपादक
मुंबई – राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी केंद्र सरकारने एकीकडे प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. तरीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री करणार्यांवर, तसेच राष्ट्रध्वज छापलेले ‘टी-शर्ट’ यांची विक्री करणारे यांच्या विरोधात कोणतीच कारवाई करण्यास पोलीस असमर्थता दर्शवत आहेत. याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करूनही संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करण्यास पोलिसांनी नकार दिला, तर आझाद मैदान पोलीस ठाण्यात विक्रेत्याला समज देऊन सोडून देण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाच्या अनादरासंदर्भातील निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर, तसेच जिल्हाधिकारी आणि पोलीस महासंचालक यांना पाठवले आहे.
‘ध्वजसंहितेनुसार सायंकाळी ६ वाजण्यापूर्वी राष्ट्रध्वज सन्मानाने उतरवला नाही, तर तो गुन्हा ठरतो; मात्र तोच राष्ट्रध्वज ‘टी-शर्ट’वर छापून कसाही टाकला, तर त्यावर कारवाई का होऊ शकत नाही ?’ असा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘राष्ट्रीय मानचिन्हांचा अपवापर रोखणे कायदा १९५०’चे कलम २ आणि ५, तसेच ‘राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम १९७१’चे कलम २ आणि ‘बोधचिन्ह अन् नाव (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम १९५०’ या तीन कायद्यांनुसार राष्ट्रध्वजाचा अवमान हा दंडनीय अपराध असल्याचे समितीच्या वतीने दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने याविषयीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर, तसेच जिल्हाधिकारी आणि पोलीस महासंचालक यांना पाठवण्यात आले आहे.
आझाद मैदान पोलीस ठाण्यात विक्रेत्याला देण्यात आली समज !
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील रेल्वेस्थानकाच्या भुयारी मार्गातील एका दुकानामध्ये राष्ट्रध्वज छापलेले ‘टी-शर्टस्’ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. याविषयी हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी १२ ऑगस्टच्या रात्री पोलीस उपनिरीक्षक शोभा भांडवलकर यांच्याकडे याविषयी तक्रार प्रविष्ट केली. डॉ. धुरी यांनी साहाय्यक पोलीस निरीक्षक विजेंद्र धुरत यांना याविषयी सांगितल्यावर त्यांनी राष्ट्रध्वजाच्या ‘टी-शर्टस्’ची विक्री करणार्या विक्रेत्याला पोलीस ठाण्यात बोलावून समज दिली. या प्रसंगी पोलिसांनी विक्रेत्याकडून अशा प्रकारच्या ‘टी-शर्टस्’ची विक्री पुन्हा करणार नसल्याचा जबाब लिहून घेतला.