श्रीनिवास रेड्डी यांच्या विरोधातील गुन्हा नागपूर खंडपिठाकडून रहित ! – नागपूर खंडपिठाचा निर्णय
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण
नागपूर – २५ मार्च या दिवशी अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हरिसालच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार आणि श्रीनिवास रेड्डी या वरिष्ठ अधिकार्यांनी मानसिक छळ केल्याचा उल्लेख करण्यात आला होता; मात्र दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर श्रीनिवास रेड्डी यांच्या विरोधात नोंद करण्यात आलेला गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने १३ ऑगस्ट या दिवशी रहित ठरवला आहे.
सुनावणी चालू असलेले हे प्रकरणही बंद केले आहे. त्यामुळे दीपाली चव्हाण यांच्यासाठी लढा देणारे त्यांचे कुटुंबीय आणि सहकारी यांना मोठा धक्का बसला आहे. दीपाली चव्हाण यांनी स्वतःच्या बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यानंतर श्रीनिवास रेड्डी यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हा रहित करण्याची मागणी करणारी याचिका त्यांनी नागपूर खंडपिठात प्रविष्ट केली होती. या याचिकेच्या सुनावणीनंतर न्यायालयाने गुन्हा रहित करण्याचे आदेश दिले आहेत.