चार हुतात्मा स्मारक (सोलापूर) येथे हुतात्म्यांच्या पराक्रमाचा फलक लावण्यात यावा !
हिंदु जनजागृती समितीची महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
अशी मागणी का करावी लागते ? – संपादक
सोलापूर, १३ ऑगस्ट (वार्ता.) – येथील चार हुतात्मे मल्लाप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, किसन सारडा आणि कुर्बान हुसेन यांचा त्याग सोलापूरवासिय कधीही विसरू शकत नाहीत, तसेच त्यांनी केलेली क्रांती अन् भारत स्वतंत्र होण्यासाठी दाखवलेले शौर्य कधीही विसरता येणार नाही. त्यामुळे चार हुतात्मा स्मारक येथे या चारही हुतात्म्यांच्या पराक्रमाच्या शौर्यगाथेचा फलक लावण्यात यावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना देण्यात आले. या निवेदनाला आयुक्त पी. शिवशंकर यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय पिसे, माजी नगरसेवक बापूसाहेब ढगे, तसेच श्री. संदीप ढगे, श्री. मनीष दायमा, श्री. यश क्षीरसागर आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की,
१. सोलापूर शहरामध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्रप्रदेश येथूनही पुष्कळ नागरिक येत असतात. या सर्व नागरिकांना येथील चार हुतात्म्यांच्या स्मारकाविषयी माहिती मिळाल्यास अभिमान वाटेल. त्यामुळे या चारही हुतात्म्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात केलेल्या क्रांतीचा इतिहास आणि त्यांनी केलेला पराक्रम सर्वांच्या लक्षात यावा, यासाठी हा फलक लावण्यात यावा.
२. सोलापूर येथील चार हुतात्मे म्हणजे सोलापूर सिद्धेश्वर नगरीचे वैशिष्ट्य आहे. या चार हुतात्म्यांचा इतिहासामध्येही उल्लेख आहे. ९ मे ते ११ मे १९३० हे ३ दिवस सोलापूरने पूर्णपणे स्वातंत्र्य उपभोगले. या स्वातंत्र्याची घोषणा करणार्या ४ हुतात्म्यांना ब्रिटिशांनी जानेवारी १९३१ मध्ये फासावर लटकवले.