सैन्याची कामगिरी वाढवण्यासाठी अमेरिकेकडून ‘सुपर’ सैनिकांची निर्मिती आणि भारताची सतर्क भूमिका !
१. वृद्धत्वाची प्रक्रियाच चालू होणार नाही, अशा स्वरूपाची औषधे अमेरिका सिद्ध करत असणे
‘अमेरिकेच्या ‘सायंटिफिक जर्नल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात म्हटले आहे की, अमेरिकेच्या संरक्षण विभागाची प्रयोगशाळा ‘सुपर’ सैनिक निर्माण करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या औषधांची निर्मिती करत आहे. त्यामुळे त्यांच्या सैनिकांना वृद्धत्व येणार नाही, त्यांचे वय वाढणार नाही, त्यांची वृद्धत्वाची प्रक्रियाच चालू होणार नाही, त्यांना गंभीर जखमा झाल्या, तरी त्या लवकर बर्या होतील, तसेच त्यांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यही चांगले राहील. त्यामुळे अमेरिकी सैन्याला लढाया जिंकण्यात यश मिळेल. हा त्यामागील उद्देश आहे. ‘सुपर’ सैनिक निर्माण करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न पुष्कळ दिवसांपासून चालू आहे. अमेरिका, युरोप किंवा चीन या देशांमध्ये अशा प्रकारचे प्रयोग सतत चालूच असतात.
२. अत्याधुनिक शस्त्रे असूनही अमेरिकेला पराभव पत्करावा लागणे
लढाईजन्य परिस्थितीत दोन घटक महत्त्वाचे असतात. एक म्हणजे लढणारे सैनिक आणि दुसरे म्हणजे त्यांच्याकडे असणारी शस्त्रे ! आज अमेरिकेच्या सैन्याकडे जगातील सर्वांत अत्याधुनिक शस्त्रे आहेत; पण तरीही ते अनेक लढाया हरले आहेत. ९/११ च्या आक्रमणानंतर अमेरिकेचे सैन्य आतंकवाद्यांच्या उच्चाटनासाठी अफगाणिस्तानमध्ये आले होते. सहस्रो कोटी रुपये आणि अत्याधुनिक शस्त्रे यांचा वापर करूनही त्यांना ती लढाई जिंकता आली नाही. त्यामुळे अलीकडेच आलेल्या वृत्तानुसार ते अफगाणिस्तानमधून परत जात आहे.
३. अमेरिकेचे सैन्य मानसिक दबाव सहन करू शकत नसल्याने ते ‘सॉफ्ट’ समजले जाणे
अमेरिकेच्या सैन्यामध्ये मानसिक दबाव सहन करण्याची शक्ती फारच अल्प आहे. तंत्रज्ञान असूनही त्यांच्या सैनिकांमध्ये लढण्याची सिद्धता नाही. त्यामुळे जगात अमेरिकेचे सैनिक हे ‘सॉफ्ट’ समजले जातात. ते युद्ध जिंकू शकले नाहीत, हे ओळखून अमेरिका ‘सुपर’ सैनिक निर्माण करण्याचे प्रयोग करत असतो.
४. अमली पदार्थांचा विपरीत परिणाम होऊन मृत्यू येण्याचीही शक्यता असणे
अनेक वेळा अमली पदार्थ घेतल्याने काही खेळाडूंची कामगिरी वाढल्याचे लक्षात येते. या पदार्थांचा तात्पुरता लाभ होत असला, तरी त्यांचे शरिरावर अयोग्य परिणाम होत असतात. परिणामी मनुष्याचा अकाली मृत्यूही होऊ शकतो. मृत्यू न होता त्याची कामगिरी वाढवता येईल का ? हे येणारा काळच सांगेल.
५. सुखदायक जीवन जगणार्या सैनिकांना लढायची इच्छा नसल्याने चीनकडूनही विविध प्रयोग केले जाणे
भारताचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू चीनही असे प्रयोग करत आहे. त्यांचीही अवस्था अमेरिकेच्या सैन्यासारखीच आहे. त्यांच्याकडे तंत्रज्ञान आहे; पण त्यांचे सैनिक लढायला सिद्ध नसतात. त्यांना सुखदायक जीवन जगण्याची सवय झालेली असते. त्यामुळे खडतर परिस्थितीचा सामना करण्याची त्यांची इच्छा नसते. याचा परिणाम म्हणून अशाच प्रकारचा प्रयोग चीनही करत आहे.
६. चीन आणि अमेरिका यांच्या ‘सुपर’ सैनिक निर्मितीच्या संशोधनावर भारताने लक्ष ठेवावे !
सध्या तंत्रज्ञान आणि जैविक संशोधन वाढत आहे. त्यामुळे चीन आणि अमेरिका करत असलेल्या अशा संशोधनावर भारताला लक्ष ठेवावे लागेल. जर भारताला अशा प्रकारची सुरक्षित औषधे मिळाली, तर तोही अपवादात्मक परिस्थितीत त्यांचा वापर करू शकतो. अशा प्रकारचे संशोधन यशस्वी करण्यासाठी पुष्कळ वेळ लागणार आहे. असे असले, तरी चीन आणि अमेरिका करत असलेल्या संशोधनावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.’
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.