पाणी प्रकल्प वेळेत पूर्ण करा !

जायकवाडी धरण

संभाजीनगर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्‍या जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा असतांनाही आणि पावसाळ्यातही शहराला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होत नाही. अनेक ठिकाणी आठवड्यातून एक वेळा किंवा ४-५ दिवसांतून एक वेळा पाणी येते. अन्य वेळी नागरिकांना टँकरचे पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. पावसाळ्यात ही स्थिती असेल, तर उन्हाळ्यात काय स्थिती होईल, याचा अंदाज आपण करू शकतो. ही समस्या केवळ संभाजीनगर जिल्ह्याची नसून अनेक ठिकाणी आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली, तरी अजून सर्वांना प्रतिदिन पिण्याचे पाणी २४ घंटे मिळत नाही, हे सर्वपक्षीय शासनकर्ते आणि प्रशासन यांना लज्जास्पद आहे.

जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर असलेले संभाजीनगरमधील एक प्रमुख धरण आहे. आशिया खंडातील सर्वांत मोठे मातीचे धरण अशी त्याची ख्याती आहे. हे धरण एकदा पूर्ण भरले, तर दोन वर्षांच्या शेतीच्या पाण्याची आणि ४ वर्षांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होते; म्हणून या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्र समजला जातो. असे असूनही संभाजीनगर येथील जनता पाण्यासाठी हाल सोसत आहे, हे दुर्दैवी आहे. या धरणातील पाणी संभाजीनगर जिल्ह्यातील जनतेला २४ घंटे मिळावे, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्ष २०१९ मध्ये पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन केले होते; मात्र या योजनेचे काम पूर्ण न झाल्याने शहरात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाने प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, हेच पुन्हा एकदा अधोरेखित होते.

सध्या महाराष्ट्रात पर्जन्यमान चांगले असतांना आणि धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असूनही जनतेपर्यंत पाणी पोचत नाही, हे चिंताजनक आहे. पाणी साठवणे आणि ते जनतेपर्यंत वेळेत पोचवण्याची व्यवस्था करणे, हे सरकारचे दायित्व आहे. देवाच्या कृपेने पाऊस भरपूर पडतो; परंतु प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे जनतेला वर्षभर पाणी वापरता येत नाही, अशी स्थिती आहे. यासाठी सरकारने राज्यातील पाणी प्रकल्पांची कामे जलदगतीने पूर्ण करून जनतेला मुबलक पाणीपुरवठा कसा होईल, याकडे लक्ष द्यायला हवे. राज्यकर्त्यांनी पाणी साठवणुकीचे दीर्घकालीन नियोजन आणि त्यानुसार प्रत्यक्ष कृती केली, तरच पाणीटंचाई दूर होईल ! जनतेनेही पाण्यासारखी महत्त्वाची समस्या सुटण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करायला हवेत.

– श्री. सचिन कौलकर, मिरज