बंदोबस्तावेळी पोलीस कर्मचार्यांचा भ्रमणभाष बंद रहाणार ! – पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा आदेश
पिंपरी (पुणे) – बंदोबस्तावरील (कर्तव्यावरील) पोलीस अधिक प्रमाणात भ्रमणभाषवर बोलण्यात, ‘चॅटिंग’ करण्यात तसेच सामाजिक माध्यमांचा वापर करतांना निदर्शनास येत आहेत. त्यामुळे शहरात बंदोबस्तावर असणार्या पोलिसांना यापुढे भ्रमणभाष वापरता येणार नाही त्यांचा भ्रमणभाष ‘स्वीच ऑफ’ म्हणजेच बंद रहाणार आहे, असा आदेश पिंपरीचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला आहे. कर्तव्यावर असतांना महत्त्वाच्या अधिकार्यालाच भ्रमणभाष वापराची अनुमती देण्यात आली आहे. अन्य कुणी बंदोबस्ताच्या ठिकाणी भ्रमणभाषचा वापर करतांना आढळल्यास वरिष्ठांना उत्तरदायी धरण्यात येईल, असेही कृष्ण प्रकाश यांनी स्पष्ट केले.
शहरात प्रतिदिन विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय सेवेतील महत्त्वाच्या व्यक्ती येतात, तसेच आंदोलने, मोर्चे यांचेही आयोजन होत असते. या सर्व कार्यक्रमांना पोलीस बंदोबस्त असतो. बंदोबस्तावेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी भ्रमणभाषवर व्यस्त असल्याच्या तक्रारी आल्या होत्या.