संभाजीनगर येथे ‘ऑनलाईन’ खेळात ९ सहस्र रुपये हरल्याने मुलाने घरातून पलायन केले !

पालकांनो, भ्रमणभाषवरील ‘ऑनलाईन’ खेळांचे दुष्परिणाम जाणून मुलांना अशा खेळांपासून दूर ठेवा ! मुलांनी अशा खेळांच्या आहारी न जाण्यासाठी, तसेच त्यांच्यामध्ये संयम निर्माण व्हावा यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे. – संपादक

प्रतीकात्मक छायाचित्र

संभाजीनगर – येथील सिडको एन्-४ परिसरात रहाणार्‍या एका प्राध्यापकाच्या १७ वर्षीय मुलाने भ्रमणभाषवरील ‘ऑनलाईन’ खेळाच्या आहारी जाऊन वडिलांच्या अधिकोष खात्यातून ९ सहस्र रुपये गमावले. आता हा प्रकार घरी समजल्यावर पालक रागावतील या भीतीने त्या मुलाने घर सोडून पलायन केले. (मुलांना ‘ऑनलाईन’ शिक्षणासाठी भ्रमणभाष संच दिल्यानंतर मुले त्याचा उपयोग कसा करत आहेत, याकडे पालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. ‘ऑनलाईन’ खेळ खेळणे किंवा  अश्लील ‘वेबसाईट’ पहाणे अशा प्रकारचे व्यसन लागून मुलांचे भवितव्य धोक्यात आल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत, हे गंभीर आणि चिंताजनक आहे. – संपादक)

जाण्यापूर्वी मुलाने आई-वडिलांना उद्देशून पत्र लिहिले असून त्यात त्याने चूक मान्य केली आहे, तसेच ‘मी घाबरलेला असल्यामुळे तुमच्यापासून दूर जात आहे; पण तुम्ही घाबरू नका, तुम्ही दिलेले संस्कार मी कधीही विसरणार नाही, मी आयुष्यात नक्की एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करेन’, असे म्हणून त्याने पत्राचा शेवट केला आहे. पुंडलिकनगर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

‘ऑनलाईन’ खेळांपासून सावध रहा !

संकेतस्थळांवर पैसे कमावण्याचे अनेक खेळ आणि ‘ॲप’ असल्यामुळे मुलांना त्याचे व्यसन जडत आहे. झटपट पैसे कमावण्याच्या उद्देशाने मुले अशा खेळांच्या आहारी जात आहेत. बहुतांश भ्रमणभाषमध्ये पालकांचे ‘ऑनलाईन पेमेंट ॲप’ असल्याने त्यातून मुले परस्पर पैसे वापरतात; पण पालकांना ते विलंबाने कळते. या पूर्वीही पुंडलिकनगर येथे एक १५ वर्षीय मुलगा जवळपास ३० सहस्र रुपये हरल्यानंतर घरातून पळून गेला होता, तर एका पोलीस अधिकार्‍याच्या मुलाने लाखो रुपये खेळात उडवले होते.