श्रावण मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

साप्ताहिक शास्त्रार्थ

‘९.८.२०२१ या दिवसापासून श्रावण मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

सौ. प्राजक्ता जोशी

१. हिंदु धर्मानुसार ‘प्लव’नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, दक्षिणायन, वर्षाऋतू, श्रावण मास आणि शुक्ल पक्ष चालू आहे.

आपल्या धर्मग्रंथात वर्षाऋतूमधील श्रावण मासात प्रतिदिन विविध धार्मिक व्रते सांगितली आहेत. श्रावण मासात प्रत्येक रविवारी मौन धारण करून ‘गभस्ति’ नावाच्या सूर्याचे पूजन करावे. प्रत्येक सोमवारी अनुक्रमे तांदूळ, तीळ, मूग, जवस आणि पाचवा सोमवार असल्यास सातू, हे ५ मुठी धान्य शिवपिंडीवर वहावे. मंगळवारी मंगलागौरीचे व्रत आणि पूजन करतात. बुधवारी बुधपूजन, गुरुवारी बृहस्पतिपूजन, शुक्रवारी जिवंतिका पूजन आणि वरदलक्ष्मी व्रत, तसेच शनिवारी अश्वत्थमारुति पूजन करतात. याविषयीची अधिक माहिती सनातन संस्थेच्या ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’ या ग्रंथात दिली आहे.

(संदर्भ : दाते पंचांग)

२. शास्त्रार्थ

२ अ. भानुसप्तमी : रविवारी येणार्‍या सप्तमीला ‘भानुसप्तमी’ म्हणतात. या दिवशी सूर्याच्या उपासनेला विशेष महत्त्व असते.

२ आ. स्वातंत्र्यदिन : भारताचा स्वातंत्र्यदिन प्रतिवर्षी १५ ऑगस्ट या दिवशी साजरा करतात.

२ इ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यांत विलंब होण्याचा संभव असतो. १५.८.२०२१ या दिवशी सकाळी ९.५२ पासून सायंकाळी ८.५० पर्यंत, १८.८.२०२१ या दिवशी दुपारी २.१४ पासून उत्तररात्री १.०६ पर्यंत आणि २१.८.२०२१ या दिवशी सायंकाळी ७.०१ पासून दुसर्‍या दिवशी सकाळी ६.१३ पर्यंत विष्टी करण आहे.

२ ई. पतेती : हा पारशी बांधवांचा नववर्षारंभ दिवस आहे.

२ उ. पुत्रदा एकादशी : श्रावण शुक्ल पक्ष एकादशीला ‘पुत्रदा एकादशी’ म्हणतात. १८.८.२०२१ या दिवशी पुत्रदा एकादशी आहे. पुत्रप्राप्तीसाठी आणि पुत्रकल्याणासाठी पुत्रदा एकादशीचे व्रत करतात. या दिवशी भगवान श्रीविष्णूचे पूजन करून तुपाचा दिवा लावतात. श्रीविष्णूला तुलसीपत्र अर्पण करतात, तसेच  एकादशी माहात्म्य आणि श्रीविष्णुसहस्रनाम यांचे वाचन करतात.

२ ऊ. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. १८.८.२०२१ या दिवशी उत्तररात्री १.०६ पासून १९.८.२०२१ या दिवशी रात्री १०.४२ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.

२ ए. यमघंट योग : रविवारी मघा, सोमवारी विशाखा, मंगळवारी आर्द्रा, बुधवारी मूळ, गुरुवारी कृत्तिका, शुक्रवारी रोहिणी आणि शनिवारी हस्त नक्षत्र एकत्र आल्यास ‘यमघंट योग’ होतो. हा अनिष्ट योग आहे. प्रवासासाठी या योग पूर्णतः वर्ज्य करावा. बुधवारी १८.८.२०२१ या दिवशी सूर्याेदयापासून रात्री १२.०७ पर्यंत मूळ नक्षत्र असल्याने यमघंट योग आहे.

२ ऐ. तिथीवासर : द्वादशी तिथीच्या प्रथम पादाला ‘तिथीवासर किंवा हरिवासर’ असे म्हणतात. वैष्णवांनी या काळात भोजन करू नये. १९.८.२०२१ या दिवशी सकाळी ६.३३ पर्यंत तिथीवासर आहे.

२ ओ. शाकदान-दधिव्रत : श्रावण शुक्ल पक्ष द्वादशी तिथीला ‘शाकदान-दधिव्रत’ करतात. या दिवशी दह्याचा उपयोग करतात. १९.८.२०२१ या दिवशी शाकदान-दधिव्रत आहे. या दिवशी विमानारूढ भगवान श्रीधराची पूजा करून अहोरात्र आनंदोत्सव साजरा करतात. ‘या व्रताचे पंचयज्ञासमान फळ मिळते’, असे मानले जाते.

२ औ. शुक्र किंवा भृगु प्रदोष : प्रत्येक मासातील शुक्ल आणि कृष्ण पक्ष त्रयोदशीला ‘प्रदोष’ असे म्हणतात. शुक्रवारी येणार्‍या प्रदोष तिथीला ‘शुक्रप्रदोष’ किंवा ‘भृगुप्रदोष’ म्हणतात. २०.८.२०२१ या दिवशी शुक्रप्रदोष आहे. जीवनातील नकारात्मकता नष्ट करण्यासाठी, तसेच वैवाहिक सुखासाठी ‘भृगुप्रदोष’ हे व्रत करतात. प्रदोष या व्रताची देवता ‘शिव’ आहे. या दिवशी सायंकाळी शिवपूजन करावे, तसेच शिवकवच आणि शिवमहिम्नस्तोत्र वाचावे.

२ अं. श्रवणाकर्म : श्रावण मासात श्रवण नक्षत्राच्या दिवशी करावयाच्या वैदिक विधीला ‘श्रावणी’ किंवा ‘श्रवणाकर्म’ म्हणतात. यालाच ‘उपाकर्म’ असेही म्हणतात. श्रवण नक्षत्र हे श्रावण पौर्णिमेच्या जवळपास येते. २०.८.२०२१ या दिवशी श्रवणाकर्म करावे.

टीप १ – ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याेदयानंतर वार पालटतो.

टीप २ – भद्रा (विष्टी करण), दुर्गाष्टमी, एकादशी, घबाड मुहूर्त, प्रदोष आणि यमघंट यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे.

टीप ३ – वरील सारणीतील शुभ / अशुभ दिवस पाहून ‘दिवस अशुभ आहे’, हे कळल्यावर ‘प्रवास किंवा इतर सेवा केल्यास त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतील’, अशी शंका साधकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा साधकांनी संतांची पुढील वचने लक्षात ठेवावीत.

१. हरिचिया दासा हरि दाही दिशा ।
भावें जैसा तैसा हरि एक ।। – संत एकनाथ

अर्थ : भक्ताला सर्वत्र देवाचेच दर्शन होते. भक्ताचा जसा भाव असतो, त्या स्वरूपात त्याला देव दिसतो.

२. तुका म्हणे हरिच्या दासा ।
शुभ काळ दाही दिशा ।। – संत तुकाराम

अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, ‘भक्तासाठी सर्व दिशा आणि वेळ ही शुभच असते.’

ज्या व्यक्तीच्या मनात सतत ईश्वरप्राप्तीचा ध्यास आहे, अशा भक्ताची काळजी ईश्वर घेतो.’

– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तू विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (६.८.२०२१)