६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली दैवी बालसाधिका कु. मोक्षदा कोनेकर हिला तिची आजी, श्रीमती अनिता कोनेकर यांची लक्षात आलेली वैशिष्ट्ये !
६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली दैवी बालसाधिका कु. मोक्षदा कोनेकर (वय ८ वर्षे) हिला तिची आजी, ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती अनिता कोनेकर (वय ६९ वर्षे) यांची लक्षात आलेली वैशिष्ट्ये !
१. प्रेमभाव
१ अ. प्रवासात असतांना सहप्रवाशांचे बाळ रडणे आणि आजीने त्याला उचलून घेतल्यावर ते रडायचे थांबणे : ‘आजीचे सर्वांवर पुष्कळ प्रेम आहे. आम्ही एकदा रेल्वेने प्रवास करतांना एक बाळ रडत होते. आजीने त्या बाळाला प्रेमाने उचलून घेतले. तेव्हा ते बाळ रडायचे थांबले. त्यामुळे बाळाच्या आई-वडिलांनाही बरे वाटले.
१ आ. पशू आणि पक्षी यांवरील प्रेम : आजीचे पशू आणि पक्षी यांच्यावर पुष्कळ प्रेम आहे. एकदा आजी सहज खिडकीत उभी होती. तेव्हा एक गाय रस्त्याच्या मधेच येऊन बसली आणि समोरून ट्रक येत होता. आजी तिला मनात म्हणत होती, ‘ए गायी, बाजूला हो ना गं ! तुझं काही झालं, तर मला ते बघवणार नाही गं ! होशील ना बाजूला ?’ आजीने मनात असे म्हटल्यावर ती गाय उठली आणि जवळच्या तिच्या गोठ्यात निघून गेली.
१ इ. आजी सतत आनंदी असते. तिला कधीही दुःख होत नाही.
१ ई. सर्वांशी मिसळून वागणे : आश्रमात नवीन साधक आल्यास आजी त्यांना ‘नमस्कार ! तुम्ही कुठून आलात ? बरे आहात ना ?’, असे विचारते आणि सर्वांशी मिसळून वागते.
१ उ. इतरांचा विचार करणे : आजीला घरात कुठे टाचणी, सुई, पिन अशा वस्तू दिसल्या, तर त्या कुणाला टोचू नयेत; म्हणून त्या लगेच जागेवर उचलून ठेवते.
२. व्यवस्थितपणा
आजी घरातील सर्व पसारा आवरते. अजूनही कधीच ती कुणाला पसारा आवरायला लावत नाही आणि सर्व साहित्य व्यवस्थित लावून ठेवते.
३. स्वीकारणे
जेव्हा आजीला कुणी काही बोलते, तेव्हा ती ते अधिक वेळ मनात न ठेवता सोडून देते.
४. ‘दिसेल ते कर्तव्य’ या भावाने प्रत्येक कृती करणे
आजीला जे काम दिसेल, ते देवाची सेवा म्हणून करते. एके दिवशी भोजनकक्षात एका साधकाकडून थोडी शिते सांडली होती. आजीने ती लगेच उचलली.
५. अल्प अहं
आजी जी काही कामे करते, उदा. देवपूजा करणे, भांडी घासणे अन् लावणे, केर काढणे, स्वयंपाक करणे. याचा तिला कधीच अहं वाटत नाही.
६. आश्रमाप्रती भाव
आजी प्रतिदिन रामनाथी आश्रमात सेवेला जाते. एके दिवशी आई-बाबांना बाहेरून यायला उशीर झाला. माझे बाबा आम्हाला (मला आणि आजीला) गाडीने आश्रमात सोडणार होते. तेव्हा बाबा म्हणाले, ‘‘आता तुम्हाला आश्रमात जेवण मिळणार नाही.’’ असे म्हटल्यावर आजीला पुष्कळ वाईट वाटले. ती बाबांना म्हणाली, ‘‘अरे, आपल्याला जेवण नाही मिळाले, तरी चालेल; पण आपण आश्रमात जाऊया.’’
६ अ. आजी आश्रमात मिळालेली सेवा लगेच करते. कधीही त्या सेवेला ती ‘नाही’ म्हणत नाही.
७. नामजप लिहून देवाच्या अनुसंधानात रहाण्यास सांगणे
आजी प्रतिदिन सकाळी नामजप लिहिते आणि ती मलाही सांगते, ‘मोक्षदा, तूसुद्धा नामजप लिहित जा. त्यामुळे आपल्याला देवाच्या अनुसंधानात रहाता येते.’
८. गुरुदेवांप्रती भाव
अ. आजीचा गुरुदेवांप्रती पुष्कळ भाव आहे. ती गुरुदेवांना आठवतच भावपूर्ण सेवा करते.
आ. आजी रात्री दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचल्याविना झोपत नाही. ती मला म्हणते, ‘‘परात्पर गुरु आपल्याला एवढे दैनिक उपलब्ध करून मार्गदर्शन करत आहेत, तर आपण ते वाचले पाहिजे.’’ असे म्हणून ती दैनिक वाचून रात्री १२ वाजता झोपते.
९. भावपूर्ण देवपूजा करणे
आजी प्रतिदिन भावपूर्ण देवपूजा करते आणि तिचा नामजप सतत चालूच असतो.
‘हे श्रीकृष्णा, माझ्या आजीची आध्यात्मिक प्रगती होवो’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे. हे श्रीकृष्णा, तूच मला अशी प्रेमळ आजी दिलीस, यासाठी तुझ्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. मोक्षदा कोनेकर (वय ८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.६.२०२०)