प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर रोखण्याविषयी केंद्रशासनाची सूचना असूनही गोव्यात काही ठिकाणी उघडपणे प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री !
हे पोलिसांना का दिसत नाही ? राष्ट्रीय प्रतिकांच्या विटंबनेविषयी पोलीस उदासीन का ?
फोंडा, १२ ऑगस्ट (वार्ता.) – आगामी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिकपासून बनवलेल्या राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी सूचना केंद्रशासनाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना केली आहे. असे असूनही गोव्यातील काही शहरांत प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री होत असल्याचे आढळून येते. मडगाव येथे काही मुले प्लास्टिकचे छोटे राष्ट्रध्वज खिशात घेऊन फिरतात आणि कुणी मागितल्यास तेवढ्यापुरते बाहेर काढून विकतात. पर्वरी येथे हमरस्त्यावरही मोठ्या टेरिकॉट कापडापासून बनवलेल्या राष्ट्रध्वजांची विक्री चालू आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, ‘विघटन न होणार्या घटकांपासून बनलेल्या वस्तूंची विल्हेवाट लावणे ही मोठी समस्या आहे. राष्ट्रध्वज हा देशातील नागरिकांच्या आशा आणि आकांक्षा यांचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे त्याची प्रतिष्ठा जपणे महत्त्वाचे आहे. राष्ट्रध्वजाप्रती सर्वांच्या मनात आदर आहे; मात्र काही नागरिक, सरकारी संस्था आदींना त्याच्या वापरासंबंधी पुरेशी माहिती नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे राष्ट्रीय सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच क्रीडा स्पर्धा यांमध्ये प्लास्टिकपासून बनलेले ध्वज वापरले जातात.’
गोव्यात हिंदु जनजागृती समितीने ७ ऑगस्ट २०२१ या दिवशी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करण्याची मागणी उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकार्यांकडे एका निवेदनाद्वारे केली होती.