बनावट कर्ज वाटप प्रकरणी सेवा विकास बँकेच्या अध्यक्षांसह २७ जणांवर गुन्हा नोंद !
दोषी अधिकार्यांची तात्काळ चौकशी होऊन त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी.
पिंपरी – सेवा विकास बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळ आणि अधिकारी यांनी मिळून १० कोटी ३७ लाख ३० सहस्र रुपये रकमेची बनावट कर्ज वाटप केली. यासाठी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्जदार अशा २७ जणांवर गुन्हा नोंद केला आहे. हा प्रकार वर्ष २०१६ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत सेवा विकास बँकेच्या पिंपरी येथील मुख्य शाखेत घडला. याविषयी सहकारी संस्थेचे सहनिबंधक राजेश जाधवर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. आरोपींनी संगनमताने, पूर्वनियोजित कारस्थान रचून, कर्जदाराची कर्ज परतफेड करण्याची क्षमता न पहाता, अपुरे तारण असतांना, मालमत्तेचे मूल्यांकन कमी असतांना, मालमत्ता विक्री योग्य आणि निर्वेध नसतांना कर्ज रक्कम वितरित केली. या घटनेसाठी भारतीय दंड विधानाच्या अनेक कलमांतर्गत गुन्हा नोंद केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर अन्वेषण करत आहेत.