सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने म्हणजे समाजाची सात्त्विकता वाढवणारे चैतन्याचे स्रोत ! – वैद्या (सौ.) प्रियाताई शिंदे
सातारा, १२ ऑगस्ट (वार्ता.) – सनातन संस्थेची उत्पादने अत्यंत उत्कृष्ट प्रतीची असून ती अत्यल्प मूल्यामध्ये उपलब्ध आहेत. सनातनचे कुंकू हे मी स्वत: दैनंदिन उपयोगात आणते. मी घरामध्ये नियमित अग्निहोत्र करते आणि त्यासाठी सनातननिर्मित भीमसेनी कापराचा उपयोग करते. कोरोना काळातही भीमसेनी कापराचा चांगला उपयोग झाला. सनातनची उत्पादने या केवळ वस्तू नसून त्या समाजाची सात्त्विकता वाढवणारे चैतन्याचे स्रोत आहेत, असे गौरवोद्गार कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या सुविद्य पत्नी वैद्या (सौ.) प्रियाताई शिंदे यांनी काढले.
वैद्या (सौ.) प्रियाताई शिंदे यांनी सातारा येथील धर्माभिमानी हिंदु तथा समाजसेवक विजय कृष्णा गाढवे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. तेव्हा त्या बोलत होत्या. या वेळी सनातनच्या साधिका सौ. विजया कणसे, सौ. प्रतिभा महामुनी, पुसेगाव येथील माजी पंचायत समिती सदस्या सौ. जाधव, युवा संघटन अध्यक्ष श्री. गणेश पालखे आणि समाजसेविका सौ. शैला विजय गाढवे उपस्थित होत्या. या वेळी कोरोनाचे नियम पाळत परिसरातील १५ ते २० महिला उपस्थित होत्या.
समाजसेवक विजय गाढवे यांचे समाजकार्य !
विजय गाढवे यांनी कोरोना काळात सलग ३ मास १२ घंटे काम करून अपंग, आबालवृद्ध, गरीब आणि होतकरू नागरिकांना विविध प्रकारचे आरोग्यसाहाय्य केले आहे. गत दीड वर्षापासून कोरोना काळातही स्वच्छता मोहीम राबवणे, मंदिर आणि परिसर यांची स्वच्छता करणे, रुग्णांसाठी रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे, वृक्षारोपण करणे, वाई तालुक्यातील झोर या गावी आणि कराड तालुक्यातील खंडोबाची पाली या गावी जाऊन पूरग्रस्तांना अन्न-धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणे आदी कार्य निरपेक्ष भावनेने करून समाजऋण फेडण्याचा प्रयत्न केला आहे.
समाजसेवक विजय गाढवे यांचे समाजाने केलेले सत्कार !
समाजसेवक विजय गाढवे यांचे समाजकार्य लक्षात घेऊन आमदार महेश शिंदे यांनी गाढवे यांचा ‘कोरोना योद्धा’ म्हणून सत्कार केला, तसेच जलसंपदा विभागाच्या वतीनेही त्यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. भाजपचे तालुकाप्रमुख राजेंद्र कांबळे यांनीही विजय गाढवे यांचा ‘कोरोना योद्धा’ म्हणून सत्कार केला, तसेच ‘लायन्स क्लब’ आणि ‘रोटरी क्लब’ यांच्या वतीने गाढवे यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले आहे.
क्षणचित्रे
१. वैद्या (सौ.) प्रियाताई शिंदे यांचा दौरा अत्यंत व्यस्त असूनही त्यांनी २० मिनिटे सनातनच्या साधिकांकडून कार्याविषयी माहिती जाणून घेतली.
२. सनातनची सात्त्विक उत्पादने अत्यंत उच्चप्रतीची असल्याने त्यांनी उपस्थितांनाही उत्पादने घेण्याचे आवाहन केले.
३. वैद्या (सौ.) प्रियाताई शिंदे यांनी अग्निहोत्रासाठी सनातननिर्मित ‘अग्निहोत्र’ ग्रंथाची मागणी साधिकांकडे केली, तसेच सनातनच्या कार्यात कोणतेही साहाय्य लागल्यास वैयक्तिक संपर्कासाठी भ्रमणभाष क्रमांकही दिला.