समाजमन कणखर बनवा !
या वर्षी पडलेल्या पावसामध्ये अनेक ठिकाणी महापूर येणे, दरड कोसळणे, तसेच भूस्खलन होणे यांमुळे गावेच्या गावे उद्ध्वस्त झाली. अनेक लोक मृत्यूमुखी पडले. गेले दीड वर्ष कोरोना महामारीच्या संकटाने संपूर्ण विश्व हतबल झाले. एकूणच काय, तर एका मागोमाग एक जीवघेणी संकटे येत आहेत. अनेक जणांचा मृत्यू होत आहे आणि जे जिवंत आहेत, त्यातील अनेक जण अनेक समस्यांमुळे मृतवत् आहेत. संकटांना सामोरे जातांना सर्वांचीच तारांबळ उडत आहे. शासनापासून जनतेपर्यंत सर्वजणच हतबल झाले आहेत. संकटामध्ये आपल्या जवळची व्यक्ती गेल्यानंतर जे मागे रहातात, त्यांना अश्रू ढाळण्यावाचून दुसरे काही करता येत नाही. स्वतः जिवंत असण्याचा आनंद व्यक्त करायचा कि जवळची व्यक्ती गेल्याचे दुःख करायचे ? हेच समजत नाही. सर्व स्थिती पाहिल्यानंतर अनेक वर्षांपासून संत आणि भविष्यवेत्ते यांनी ‘घोर आपत्काळ येणार आहे’, हे सांगितले आहे. त्याची झलक या काही मासांत अनुभवली. ही झलक असेल, तर घोर आपत्काळ काय असणार ? याची कल्पनाच करू शकत नाही.
यामध्ये भारताची आपत्काळाला सामोरे जाण्याची स्थुलातील सिद्धता कशी आहे, हे कोरोना महामारीमध्ये सर्वांनी अनुभवले. नैसर्गिक आपत्ती किंवा जैविक आपत्ती असो, त्यांचा प्रतिकार करणे अतिशय कठीण आहे, तसेच ‘जे समोर घडते, ते पहाण्यासाठी मन कणखर असणे’, हे त्याहून कठीण आहे. विज्ञानाने कितीही प्रगती केली किंवा आपत्काळाला सामोरे जाण्याची सिद्धता केली, तरी संकट येणार नाही, असे आपण म्हणू शकत नाही. अशा वेळी प्रत्येकाने कणखर होणे आवश्यक आहे.
कमकुवत व्यक्ती कोणत्याही संकटाला सामोरी जाऊ शकत नाही. त्यामुळे शासनाने समाजमन कणखर बनवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. भावनांना आवर घालायला शिकवले, तरच मनुष्य कणखर बनेल. भावनांना आवर घालण्याचे प्रशिक्षण एका दिवसात होऊ शकत नाही, यासाठी धर्मशिक्षण देऊन साधना करवून घेऊन सत्य स्वीकारण्याची शक्ती मनुष्यात निर्माण करायला हवी. मृत्यू कुणालाही चुकलेला नाही, हे सत्य स्वीकारून त्याला सामोरे जाण्याचे बळ निर्माण करायला हवे, तरच व्यक्ती येणार्या आपत्काळाला सामोरी जाऊन नवनिर्मिती करेल.
– वैद्या (कु.) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल.