वाहतुकीचे नियम मोडणार्यांकडून दंड वसूल करण्यासाठी लोकअदालतीचा पर्याय !
आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा हा परिणाम ! – संपादक
मुंबई – वाहतुकीचे नियम मोडणार्यांकडून मुंबई वाहतूक पोलीस थकीत ई-चलानची रक्कम वसूल करत आहेत; परंतु त्यात येणार्या समस्यांचे निराकरण आता लोकअदालतीद्वारे करण्यात येणार आहे. ही लोक अदालत २५ ते २७ सप्टेंबर या कालावधीत चालणार आहे. वाहतुकीचे नियम मोडणार्यांकडून ४३२ कोटी रुपयांचा दंड वसूल करणे शेष (बाकी) आहे.
वर्ष २०१६ ते ३१ जुलै २०२१ पर्यंत ई-चलानद्वारे ६८० कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला असून त्यापैकी २४८ कोटी रुपये वसूल झाले आहेत.
वाहतुकीचे नियम मोडणार्यांकडून ई-चलानद्वारे दंड वसूल केला जातो; परंतु काही जण दंड भरत नसल्याने पोलीस संबंधितांच्या घरी जाऊन दंडाची रक्कम वसूल करत आहेत; पण यात ई-चलान चुकीचे असणे, दिवसातून दोन वेळा ‘नो पार्किंग’साठी दंड आकारणे, ई-चलान करतांना वाहनाचा मालक दुसराच कुणीतरी असणे, अशा प्रकारची कारणे लोकांकडून देण्यात येत आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांना दंड वसूल करण्यात अडचणी येत आहेत. त्या लोकअदालतीद्वारे निकाली काढण्यात येतील. लोकअदालतीच्या सुनावणीमध्ये १६ न्यायाधीश असणार आहेत.