गोव्यासाठी संमत करण्यात आलेल्या एकूण ३८६ कोटी १४ लक्ष रुपयांच्या प्रकल्पांपैकी केवळ १६ कोटी १५ लक्ष रुपयांचे १० प्रकल्प पूर्ण
केंद्रशासनाची स्मार्ट सिटी योजना !
पणजी, ११ ऑगस्ट (वार्ता.) – केंद्रशासनाच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेच्या अंतर्गत गोवा राज्यासाठी ३८६ कोटी १४ लक्ष रुपये किमतीचे एकूण १९ प्रकल्प संमत करण्यात आले होते. यांपैकी केवळ १६ कोटी १५ लक्ष रुपये किमतीचे १० प्रकल्प पूर्ण करण्यात आल्याची माहिती ११ ऑगस्टला राज्यसभेत देण्यात आली. उर्वरित प्रकल्पांपैकी ३२९ कोटी ८ लक्ष रुपये किमतीच्या ७ प्रकल्पांचे काम चालू असून ४० कोटी १ लक्ष रुपये किमतीच्या २ प्रकल्पांच्या निविदा काढण्याचे काम चालू आहे. तरीही ९० लाखांचा निधी शिल्लक रहातो. २५ जून २०१५ या दिवशी केंद्रशासनाकडून देशातील १०० शहरांच्या विकासासाठी ‘स्मार्ट सिटी’ योजना चालू करण्यात आली होती. यासाठी जानेवारी २०१६ ते जून २०१८ या कालावधीत ४ निवडफेर्या होऊन १०० शहरांची निवड करण्यात आली होती.