वाई (जिल्हा सातारा) येथे घरफोडी !

सातारा जिल्ह्यात घरफोडीचे सत्र चालूच !

सातारा, ११ ऑगस्ट (वार्ता.) – ९ ऑगस्टच्या रात्री वाई येथील पेठकर कॉलनीत चोरांनी ५ घरे फोडण्याचा प्रयत्न केला. एका घराचा कडीकोयंडा उचकटून चोरांनी ४० सहस्र रुपये चोरले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात बंदिस्त झाली आहे. वाई पोलीस चोरांचा तपास करत आहेत.

चोरांच्या टोळीने पेठकर कॉलनीमध्ये शिरून ज्यांची घरे बंद होती, त्या घरांचे कडीकोयंडे उचकटण्यास प्रारंभ केला. लक्ष्मण हरिबा राजपुरे यांच्या घरातील ४० सहस्र रुपयांचे दागिने चोरांनी चोरून नेले. पुढे कॉलनीतील इतर घरे फोडणार तोपर्यंत नागरिकांनी आरडाओरडा केला. चोरांनी लगेच पलायन केले. पोलीस या प्रकरणाचे अन्वेषण करत आहेत.

पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी नागरिकांची मागणी !

सातारा शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोडीच्या घटना घडत आहेत. यामुळे पोलीस काय करत आहेत ? असा प्रश्‍न सामान्य नागरिकांना पडला आहे. सामान्य नागरिकांकडून सातारा पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण केले जात आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रगस्त वाढवून अशा घटनांना आळा घातला पाहिजे, अशी मागणी जिल्ह्यातून होत आहे.