सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी पू. (सौ.) संगीता जाधव यांच्यासाठी सांगितलेले नामजपादी उपाय करतांना पू. रमेश गडकरी यांनी अनुभवलेले सूक्ष्म युद्ध !
१. नामजप चालू केल्यावर ‘पू. (सौ.) जाधव यांच्या भोवती त्रासदायक शक्तीचे पुष्कळ आवरण असून त्यांच्या डोक्यावर सूक्ष्मातून एक काळाकभिन्न नाग वेटोळे घालून बसला आहे’, असे दिसणे
‘१.६.२०२० या दिवशी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी पू. (सौ.) संगीता जाधव यांच्यासाठी शोधलेले नामजपादी उपाय मला एक घंटा करण्यास सांगितले होते. माझ्या आधी हे नामजपादी उपाय पू. दाभोलकरकाका करत होते. मी नामजप चालू केल्यावर १ – २ मिनिटांनी मला ‘पू. (सौ.) संगीता जाधव यांच्या भोवती त्रासदायक शक्तीचे पुष्कळ आवरण दिसले, तसेच ‘त्यांच्या डोक्यावर सूक्ष्मातून एक काळाकभिन्न नाग वेटोळे घालून बसला आहे’, असे मला दिसले. त्या नागाचे डोळे निखार्यासारखे लालबुंद होते. तो माझ्याकडे पाहून फुत्कार करत होता. माझ्या तोंडवळ्यावर काहीतरी उडत होते. ‘लाल डोळ्यांच्या माध्यमातून नाग मला संमोहित करत आहे’, असे सूक्ष्मातून जाणवले.
२. प्रथम सूक्ष्मातील मोहिनीअस्त्र आणि नंतर गरुडास्त्र यांना प्रार्थना केल्यावर त्या अस्त्रांनी काळ्या नागाशी केलेले सूक्ष्मातील युद्ध !
मला मोहिनीअस्त्राची आठवण आली आणि मी सूक्ष्मातील मोहिनीअस्त्राला प्रार्थना केली, ‘या नागापासून माझे संरक्षण कर.’ तेव्हा मोहिनीअस्त्राने दुसर्या नागाचे रूप घेऊन त्या नागावर मोहिनी टाकायला आरंभ केला. त्यानंतर २ – ४ मिनिटांतच त्या काळ्या नागाचे डोळे हळूहळू निस्तेज होऊ लागले. मी गरुडास्त्राला प्रार्थना केली आणि त्या नागाला ‘तेथून घेऊन जावे’, असे सांगितले. सूक्ष्मातील गरुड त्या नागाला (सौ.) संगीता जाधव यांच्या डोक्यावरून खसकन् ओढून दूर घेऊन गेला आणि नाहीसा झाला. त्याच वेळी मला माझ्या छातीवर असलेला दाब न्यून होऊन पू. (सौ.) संगीता जाधव यांचा त्रास न्यून झाल्याचे जाणवले.
३. सद्गुरु राजेंद्रदादांनी पू. (सौ.) जाधव यांचा त्रास दूर झाला असल्याचे सांगणे आणि पू. (सौ.) जाधव यांनीही ‘माझ्या डोक्यावरून काहीतरी निघून गेल्याचे जाणवले’, असे सांगणे
त्यानंतर थोड्या वेळाने मी सद्गुरु राजेंद्रदादांना ‘पू. (सौ.) संगीता जाधव यांचा त्रास कसा आहे ?’, असे विचारले असता त्यांनी पू. (सौ.) संगीता जाधव यांचा त्रास दूर झाला असून मला नामजप थांबवायला सांगितले. मी ही अनुभूती (सौ.) संगीता जाधव यांना सांगितली. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘मलाही माझ्या डोक्यावरून काहीतरी एका क्षणात निघून गेल्याचे जाणवले आणि माझा त्रास न्यून झाला.’’
४. पू. (सौ.) जाधव यांच्यासाठी जप करतांना पू. दाभोलकरकाकांच्या तोंडवळ्याची आग होण्याचे लक्षात आलेले कारण
मी पू. दाभोलकरकाकांना ही अनुभूती सांगितली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘मी पू. (सौ.) संगीता जाधव यांच्यासाठी नामजप करत असतांना माझ्या तोंडवळ्याची आग होत होती.’’ ‘नागाने पू. दाभोलकरकाकांच्या तोंडवळ्यावरही सूक्ष्मातून विषाचा फवारा केला होता’, असे लक्षात आले.
या सूक्ष्मातील युद्धाची अनुभूती दिल्याविषयी मी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (पू.) श्री. रमेश गडकरी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.६.२०२०)
|