पुनर्वसनामध्ये वशिलेबाजी झाल्याचा वेळे ग्रामस्थांचा आरोप
सातारा, ११ ऑगस्ट (वार्ता.) – डोंगर खचल्यामुळे जावळी तालुक्यातील वेळे या गावातील ७५ कुटुंबियांचे पुनर्वसन रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील पळस्पे येथे करण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र ७५ पैकी केवळ १२ कुटुंबियांनाच पळस्पे येथे जागा देण्यात आली आहे. याला वेळे ग्रामस्थांनी विरोध दर्शवला असून भूमीची वाटणी सर्वांमध्ये समान झाली पाहिजे, पुनर्वसनामध्ये कोणतीही वशिलेबाजी होता कामा नये, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
पुनर्वसन ठरले तेव्हा सर्व ७५ कुटुंबियांना पनवेल येथील पळस्पे येथे भूमी देण्याचे ठरले होते. याला सर्वानुमते अनुमती देण्यात आली होती; मात्र नंतर वनविभागाने पुरेशी भूमी नसल्याचे सांगून ७५ पैकी केवळ १२ कुटुंबियांनाच पळस्पे येथे भूमी दिली. या वेळी संबंधितांनी तोंडे पाहून अथवा वशिल्याने भूमी दिली जात आहे. त्यामुळे समान वाटण्या झाल्या नाहीत, तर प्रसंगी आमरण उपोषण करू, अशी चेतावणी ग्रामस्थांनी दिली आहे. माने कॉलनी, भोळी, धनगरवाडी, खंडाळा या ठिकाणी पुनर्वसनाचा पर्याय ग्रामस्थांनी सुचवला आहे.