चंद्रपूर येथील आमदार जोरगेवार यांनी विनामूल्य वीज देण्याचे आश्वासन पूर्ण न केल्याने भाजपचे आंदोलन !
लोकप्रतिनिधींनी निवडणुकीपूर्वी आश्वासने देणे आणि निवडून आल्यानंतर आश्वासने पूर्ण न करणे ही जनतेची फसवणूक आहे. राज्यावरील कर्जाचा भार वाढून अर्थव्यवस्था खिळखिळी होईल, अशी फसवी आश्वासने देणार्या लोकप्रतिनिधींवर कारवाई केली पाहिजे !
चंद्रपूर – ‘वर्ष २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी घोषणापत्रात येथील जनतेला प्रति मासाला विजेचे २०० युनिट विनामूल्य देण्याचे आश्वासन पूर्ण न करता जनतेशी विश्वासघात केला आहे. पावणे दोन वर्षांनंतरही सरकारला समर्थन देणारे जोरगेवार यांनी आश्वासन पूर्ण करण्यासाठी कुठलेही पाऊल उचलले नाही. त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे. अशा आमदारांना स्वतःच्या पदावर रहाण्याचा अधिकार नाही. त्यांनी त्वरित आमदारकीचे त्यागपत्र द्यावे’, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) देवराव भोंगळे यांनी येथे केले. भाजपच्या वतीने ९ ऑगस्ट या दिवशी गांधी चौक येथे आमदार जोरगेवार यांच्याविरुद्ध आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी आमदार जोरगेवार यांच्या विरोधात घोषणा दिल्या. या वेळी पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना अटक करून त्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला; मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी न घाबरता स्वत:ला अटक करून घेतली. या वेळी महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे आदी उपस्थित होते.