लोकसभा नियोजित वेळेआधीच अनिश्चित काळासाठी स्थगित

गदारोळामुळे अधिवेशनातील ९६ घंट्यांपैकी एकूण ७४ घंटे आणि ४६ मिनिटे वाया !

वेळ वाया घालवण्याला उत्तरदायी असणार्‍या प्रत्येक खासदाराकडून त्याचा व्यय वसूल करून त्यांची खासदारकी रहित करण्याचा कायदा केला पाहिजे, तरच अशा घटना कायमच्या थांबतील ! – संपादक 

नवी देहली – संसदेचे पावसाळी अधिवेशन चालू झाल्यापासून गदारोळामुळे कामकाज पूर्णपणे चालू झालेले नाही. त्यातच ११ ऑगस्ट या दिवशी लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले. लोकसभा १३ ऑगस्ट या दिवशी स्थगित होणार होती. त्यापूर्वीच हा निर्णय घेण्यात आला.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, अधिवेशनातील कामकाज अपेक्षेप्रमाणे नव्हते. अधिवेशनात राज्यघटनेच्या १२७ व्या सुधारणा विधेयकासह एकूण २० विधेयके संमत करण्यात आली. ६६ प्रश्नांची तोंडी उत्तरे देण्यात आली. सदस्यांनी नियम ३७७ अंतर्गत ३३१ सूत्रे मांडली. या अधिवेशनात केवळ २१ घंटे १४ मिनिटे काम करण्यात आले. ९६ घंट्यांपैकी एकूण ७४ घंटे आणि ४६ मिनिटे काम करता आले नाही.