आधुनिक वैद्य (डॉ.) कै. नितीन कोठावळे यांची त्यांच्या मुलाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या मृत्यूपूर्वी अन् मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे

‘२९.६.२०२१ या दिवशी नवे पारगाव (तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर) येथील सनातनचे साधक आधुनिक वैद्य (डॉ.) नितीन कोठावळे यांचे निधन झाले. त्यांच्याविषयी त्यांचा मुलगा आधुनिक वैद्य (डॉ.) कौशल याला जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

(डॉ.) नितीन कोठावळे
कै. आधुनिक वैद्य (डॉ.) नितीन कोठावळे यांनी मृत्यूपूर्वीच्या आजारपणात जे शांतपणे भोगले, त्याचे कौतुक करावे तेवढे थोडे ! पती आधुनिक वैद्य (डॉ.) नितीन कोठावळे यांच्या गंभीर आजारपणातही स्थिर रहाणार्‍या आधुनिक वैद्या (डॉ.) श्रीमती शिल्पा नितीन कोठावळे यांचे अभिनंदन ! आधुनिक वैद्या (डॉ.) श्रीमती शिल्पा आणि त्यांचा मुलगा आधुनिक वैद्य (डॉ.) कौशल यांनी लिहिलेल्या लेखांमुळे कै. आधुनिक वैद्य (डॉ.) नितीन कोठावळे यांची गुणवैशिष्ट्ये सर्वांना ज्ञात झाली. त्यासाठीही त्यांचे अभिनंदन ! 

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (११.८.२०२१)

(डॉ.) श्रीमती शिल्पा नितीन कोठावळे

(११.८.२०२१ या दिवशी आधुनिक वैद्या (डॉ.) शिल्पा नितीन कोठावळे यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे.)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/501918.html

१. वडिलांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१ अ. साधेपणा : ‘बाबा आधुनिक वैद्य असूनही अतिशय साधे होते. त्यांच्या अनेक आधुनिक वैद्यांशी ओळखी होत्या, तरीही ते रुग्णाईत असतांना रुग्णालयात गेल्यावर त्यांचा क्रमांक येईपर्यंत थांबत असत. ओळख आहे; म्हणून ते क्रमांक न लावता तपासणीसाठी कधी जात नसत.

१ आ. स्वयंशिस्त आणि नीटनेटकेपणा : ते सगळ्या सेवा आणि कामे शिस्तबद्ध पद्धतीने करायचे. ते प्रत्येक गोष्ट ठरलेल्या वेळेत आणि योग्य पद्धतीने करायचे. ते प्रत्येक वस्तू नीट ठेवत असत आणि वस्तू नीट ठेवण्याची पद्धत ते इतरांनाही शिकवत असत.

१ इ. काटकसर : ‘प्रत्येक वस्तू आवश्यक तेवढीच कशी वापरायची आणि तिचा पुरेपूर उपयोग कसा करायचा ?’, याकडे त्यांचे लक्ष असायचे. ते अनावश्यक कपडे खरेदी करण्यात पैसे व्यय करत नसत.

१ ई. स्वावलंबी : घरी पुष्कळ लोक साहाय्य करायला असूनसुद्धा ते स्वतःची सगळी कामे स्वतः करत असत. ‘घरातील भांडी धुणे, स्वतःच्या आणि माझ्या बुटांना ‘पॉलिश’ करणे’ इत्यादी कामेही ते करत असत. त्यांचे आवरून झाल्यावर ते आईला आणि मला साहाय्य करत असत.

१ उ. ते सर्व साधकांना आणि त्यांच्या समवेत काम करणार्‍यांना समजून घेत असत. ते सर्वांशी मित्राप्रमाणे बोलत आणि वागत असत.

२. वडील रुग्णाईत असतांना जाणवलेली सूत्रे

(डॉ.) कौशल नितीन कोठावळे

२ अ. प्रतिकूल परिस्थितीतही शांत आणि स्थिर असणे

१. त्यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. तेव्हा ते अतिशय शांत आणि सकारात्मक होते. आजारपणाचा ताण न घेता ‘आता पुढे कोणती उपाययोजना करू शकतो ?’, याविषयी त्यांनी शांतपणे अभ्यास केला होता.

२. त्यांच्या आजाराचे निदान झाल्यावर थोड्याच दिवसांत माझ्या आजोबांचे निधन झाले. त्या वेळी बाबांना त्रास होत असूनही त्यांनी शांत राहून आईला आणि मला साहाय्य केले.

२ आ. आयुर्वेदावर श्रद्धा असणे : त्यांची आयुर्वेदावर पुष्कळ श्रद्धा होती. वैद्यांचा सल्ला घेऊनच त्यांनी ‘ॲलोपॅथी’प्रमाणे उपचार घेण्यास आरंभ केला. ‘ॲलोपॅथी’चे उपचार चालू असतांना त्यांनी पंचगव्यासारखे साहाय्यक (‘सपोर्टिव्ह’) उपचार (भारतीय गायीचे दूध, मूत्र, शेण, तूप आणि दही वापरून करण्यात येणारे उपचार) चालू केले.

२ इ. इतरांचा विचार करणे : या वर्षी त्यांना २ वेळा रुग्णालयातील अतीदक्षता विभागामध्ये भरती करावे लागले. तेव्हा आई, मी आणि माझा मित्र यांपैकी एकाला त्यांच्यासह कायम थांबावे लागायचे. तेव्हासुद्धा ते त्यांचे सगळे आवरून झाल्यानंतर आम्हाला ‘जाऊन विश्रांती घ्या किंवा जेवून घ्या’, असे सांगायचे. आम्हाला ताण येऊ नये; म्हणून विनोदबुद्धी वापरून ते आमच्या मनावरील ताण हलका करण्याचा प्रयत्न करायचे.

२ ई. सेवेची तळमळ : असह्य वेदना होत असतांनासुद्धा त्यांना जेव्हा बरे वाटेल, तेव्हा ते सेवा करायचे. त्यांना पुष्कळ वेदना आणि त्रास होत असतांनाही शेवटपर्यंत त्यांनी ‘सोशल मिडिया’ची सेवा केली. काही वेळा भ्रमणभाष धरण्याची किंवा चष्मा घालायचीसुद्धा शक्ती नसतांना बाबा ती सेवा पूर्ण करायचे.

३. वडिलांच्या मृत्यूपूर्वी जाणवलेली सूत्रे

३ अ. वडिलांच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी साधकाने त्याच्या आईच्या सांगण्याप्रमाणे बाहेरगावी जाण्याचे रहित करणे आणि त्यामुळे त्याला वडिलांच्या मृत्यूनंतरचे सर्व विधी करता येणे : बाबांच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी कामानिमित्त माझे मुंबईला जायचे नियोजन होते. माझी जाण्याची सर्व सिद्धता झाल्यावर निघण्याआधी आईने मला बोलावून सांगितले, ‘‘तू येथे थांबावेस’, असे मला वाटते.’’ देवाने मला बुद्धी दिली आणि तिचे ऐकून मी थांबलो. त्यामुळे बाबांच्या मृत्यूनंतरचे सर्व विधी देवाने माझ्याकडून करवून घेतले.

३ आ. बाबांनी मृत्यूपूर्वी साधारण १ घंटा आईला आणि मला सांगितले, ‘‘आज मी जाणार आहे.’’

४. बाबांच्या मृत्यूच्या आधी आणि मृत्यूच्या वेळीही मला माझ्या मनावर किंवा घरात जडत्व जाणवत नव्हते. मला मनाची निर्विचार स्थिती अनुभवायला मिळाली.

५. वडिलांच्या मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे

५ अ. मृत्यूनंतरचे विधी करतांना नकारात्मता न जाणवता निर्विचार स्थिती अनुभवता येणे : बाबांना घेऊन स्मशानभूमीत जातांना आणि तेथील सर्व विधींच्या वेळीही माझे मन पूर्ण निर्विचार असल्याचे मला जाणवले. त्या वेळी माझ्या मनात अन्य कोणताही विचार किंवा नकारात्मकता नव्हती.

५ आ. मृत्यूनंतर तिसर्‍या दिवशीही अस्थी पुष्कळ गरम असल्याचे लक्षात येणे : तिसर्‍या दिवसाचा विधी करतांना माझा दत्ताचा नामजप चालू होता. तिसर्‍या दिवशी अस्थी पुष्कळ गरम असल्याचे मला जाणवले. तेथे असणार्‍या सर्वांच्या बोलण्यातून ‘अस्थी पुष्कळ गरम आहेत’, हे वेगळे आहे’, असे माझ्या लक्षात आले.

५ इ. पू. आबांच्या (मिरज येथील सनातनच्या आश्रमातील सनातनचे ५१ वे संत पू. जयराम जोशीआजोबा (वय ८३ वर्षे)) यांच्या ओळखीने मिळालेल्या पुरोहितांनी शास्त्रोक्त पद्धतीने सर्व विधी केले.

‘या प्रसंगातून देवानेच आम्हाला सावरले आणि त्यानेच सर्व करवून घेतले’, याची मला प्रत्येक क्षणाला जाणीव होत होती. गुरुदेवांनीच या सर्व प्रसंगांमध्ये आम्हाला स्थिर ठेवले. ‘खरी गुरुकृपा काय असते ?’, हे गुरुदेवांच्या कृपेनेच आम्हाला अनुभवायला मिळाले’, याविषयी त्यांच्या चरणी अनंत कृतज्ञता !’

– आधुनिक वैद्य (डॉ.) कौशल कोठावळे (मुलगा), नवे पारगाव, तालुका हातकणंगले, कोल्हापूर. (२६.७.२०२१)