संभाजीनगर शहरातील गुंडगिरी वाढल्याने उद्योजकांकडून निषेध; पालकमंत्र्यांना निवेदन देणार !
संभाजीनगर – शहरातील विविध औद्योगिक वसाहती, पेट्रोलपंप आणि चारचाकी विक्री केंद्र येथे गुंडगिरीचे प्रमाण वाढत असल्याने याचा येथील उद्योजकांनी निषेध केला आहे. ‘गुंडगिरीच्या घटनांकडे लक्ष वेधण्यासाठी विविध संघटना पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहेत, तसेच गुंडगिरीच्या घटनांची माहिती एकत्रित करून ती पालकमंत्र्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवली जाईल’, असे उद्योजकांकडून सांगण्यात आले आहे. (गुंडगिरी वाढली आहे, हे पोलिसांच्या का लक्षात येत नाही ? जनतेला का सांगावे लागते ? – संपादक)
शहरातील ‘भोगले ऑटोमोबाईल्स’ या आस्थापनातील एक कर्मचारी पूर्ण क्षमतेने काम करत नव्हता. त्यामुळे त्याच्याकडे लेखी जाब मागण्यात आला होता. त्याला त्याचे काम न देता अन्य काम देण्यात आले होते. त्याचा राग मनात ठेवून या कर्मचार्याने हात धुण्यासाठी ठेवण्यात आलेले द्रवरूप साबणाचे पाणी प्यायले. त्याला आस्थापनातील प्रशासनाने रुग्णालयात भरती केल्यानंतर १०-१२ जणांच्या जमावाने या आस्थापनातील अधिकारी आणि कर्मचारी यांना पुष्कळ मारहाण केली. ‘अशा घटना चांगले वातावरण बिघडवतात’, असे मत विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले आहे.