प्रामाणिकपणा वाढवा !
२८ जुलै या दिवशी सातारा जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४६ दाखवण्यात आली होती. प्रत्यक्षात २० ते २६ जुलै या कालावधीत झालेल्या मृतांच्या नोंदी २८ जुलै या दिवशी संकेतस्थळावर ‘अपलोड’ केल्यामुळे एकाच दिवशी ४६ मृत्यू झाले, असा त्याचा अर्थ निघाला. यामध्ये रुग्णालयांनी या नोंदी वेळच्या वेळी न केल्याचा हा परिणाम आहे, हे उघड झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रशासनाची धावपळ झाली. जिल्ह्यात दळणवळण बंदीचे नियम शिथिल न होता ते कडकच राहिले. त्यामुळे व्यापारी आणि सामान्य लोक यांचे झालेले हाल वेगळेच !
मृतांच्या नोंदीमध्ये खासगी रुग्णालयांसह मोठ्या कोविड रुग्णालयांकडूनही पुष्कळ प्रमाणात चुका झाल्या आहेत. कोरोनाबाधितांची संख्या वेळोवेळी संकेतस्थळावर ‘अपलोड’ न केल्यामुळे संसर्ग झालेल्यांचा दर वाढून जिल्हा दळणवळण बंदीच्या खाईत लोटला गेला होता. याविषयीचा घोटाळा बाहेर आल्यानंतर आरोग्य विभागाकडून एकाच दिवशी ५ सहस्र कोरोनाबाधित रुग्णांना ‘डिस्चार्ज’ देऊन नवा विक्रमही केला गेला. यामध्ये अनेक रुग्णालयांनी मृतांची आकडेवारी प्रतिदिन संकेतस्थळावर ‘अपलोड’ करण्याची कार्यपद्धत न पाळल्याचा हा परिणाम किती गंभीर आहे, हे लक्षात येते.
प्रशासनाच्या अशा अक्षम्य चुकांमुळे नागरिकांना हाल सोसावे लागतात. एरव्हीच प्रशासकीय स्तरावरील कारभार चोख नसल्यामुळे कर्मचार्यांना आपत्काळातही अचूक कृती करता येत नाहीत, हे सिद्ध होत आहे. असाच भाग कोरोना महामारीच्या वेळी कोणत्या रुग्णालयात किती खाटा शेष आहेत, हे रुग्णांच्या नातेवाइकांना समजावे, याविषयीची माहिती रुग्णालयांना संकेतस्थळावर भरण्यास सांगितलेली होती. तेव्हाही त्यामध्ये घोळ करण्यात आला. खाटा उपलब्ध असूनही रुग्णालयांनी त्या दाखवल्या नाहीत. उलट रुग्णांच्या नातेवाइकांकडून जादाची रक्कम घेऊन एकच खाट उपलब्ध आहे, असा दबाव निर्माण करून पैसे लुटण्याचा प्रकार झाला. या प्रातिनिधिक उदाहरणांतून बोध घेऊन समाजाला आताच शिस्त लावली नाही, तर येणार्या आपत्काळात देशाची स्थिती काय होईल ? याचा अंदाज बांधता येतो. त्यामुळे लोकहो, स्वतःमध्ये प्रामाणिकपणा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा. यातूनच स्वतःचे, समाजाचे आणि पर्यायाने देशाचे कल्याण होणार आहे. – श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा