‘नासा’ची वैज्ञानिक भविष्यवाणी !
साधारण गेल्या ३ शतकांमध्ये पृथ्वीच्या वातावरणात कमालीचे पालट झाले. वर्ष १७६० ते १८२० हा काळ ‘इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन’चा (औद्योगिक चा) काळ होता. युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे चालू झाले, नवनवीन वस्तूंची निर्मिती होऊ लागली. अनेक वैशिष्ट्यपूर्ण संशोधनेही करण्यात आली. समृद्ध भारतियांच्या तुलनेत १८ व्याच काय; परंतु अगदी १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत जिथे युरोपीय लोक अत्यंत मागासलेले आणि हलाखीचे जीवनमान जगत होते, त्या युरोपीय समाजजीवनाचा कायापालट झाला. पुढील काळात भारतियांनाही त्याचा अवश्य लाभ झाला. आज भारत आणि भारतीय हे अभियांत्रिकी, तसेच वैज्ञानिक क्षेत्रांत नवनवीन शोध लावण्यात महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. गेल्या ३०-४० वर्षांत विज्ञानाने केलेली प्रगती ही डोळे विस्फारायला लावणारी आहे. संपर्क यंत्रणेचा विचार केला असता ‘एस्.टी.डी. कॉल’ करण्यासाठी ‘टेलिफोन बूथ’च्या बाहेर लागत असलेल्या लोकांच्या रांगा येथपासून ‘कॉईन बॉक्स’वरून आपण रहात असलेल्या जिल्ह्यात कुठेही संपर्क करण्याची सुविधा ते भ्रमणभाषवरून संपर्क करण्याची रूढ झालेली पद्धत आणि आज पृथ्वीच्या पाठीवर कुठेही अन् केव्हाही ‘व्हिडिओ कॉल’ करून आपल्या आप्तेष्टांशी समयमर्यादा न ठेवता करता येत असलेली हितगुज, हा प्रवास मानवाच्या वैज्ञानिक प्रगतीच्या आलेखाचे अत्यंत उपयुक्त उदाहरण म्हणता येईल. ‘मिलेनियल्स्’ म्हणून नावारूपाला आलेल्या पिढीने (वर्ष १९८१ ते १९९६ या कालावधीत जन्माला आलेल्या लोकांनी) हे पालट स्वत:च्या जीवनप्रवासात प्रकर्षाने अनुभवले आहेत.
जीवघेणे विज्ञान आणि तुटपुंजे उपाय !
कोळसा, युरेनियम, ‘आयर्न ओर’ यांसारख्या अनेक खनिजांचे अनियंत्रित उत्खनन, अमर्याद वृक्षतोड, समुद्रालगत असलेल्या शहरांच्या विकासासाठी समुद्राला मागे ढकलण्याचे प्रकल्प यांसारखे अतिरेकी प्रकार करत मनुष्याने निसर्गाला जुमानले नाही. त्यामुळे मनुष्याला भौतिक प्रगतीसमवेत जीवघेण्या संघर्षाला तोंड द्यावे लागत आहे. वर्ष १९४८ मध्ये अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया राज्यात वाढलेल्या जीवघेण्या वायूमुळे २० लोक मृत्यूमुखी पडले, तर ७ सहस्रांहून अधिक लोकांना गंभीर आजार झाले. ‘ग्रेट स्मॉग ऑफ १९५२’ या नावाने ओळखल्या जाणार्या प्रदूषणाच्या भस्मासुरामुळे लंडनमध्ये काही दिवसांच्या कालावधीत तब्बल ४ सहस्र लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. चीनच्या एका प्रांतात गेल्या मासात १ सहस्र वर्षांत झाला नाही, इतका पाऊस पडला. सुनामी, ‘टोरनॅडो’सारखी चक्रीवादळे, जंगलांमध्ये लागत असलेल्या आगी ही सर्व अतिरेकी विज्ञानवादाची फळे आहेत. अशा अनेक दुर्घटना आणि नैसर्गिक आपत्ती यांमुळे त्यावर मात करण्यासाठी विविध देशांकडून विशेष प्रयत्न चालू झाले. ‘अर्थ डे’ म्हणजे वैज्ञानिक प्रगतीमुळे पृथ्वीचा र्हास होऊ नये, ही जाणीव वृद्धींगत होण्यासाठीचा वर्षातून एकदा पाळला जाणारा दिवस, हे त्याचे एक उदाहरण ! अशा अनेक मोहिमा आज जागतिक स्तरावर राबवल्या जात आहेत. असे असले, तरी प्रदूषण आणि त्यामुळे होत असलेल्या नैसर्गिक संपत्तीचा र्हास थांबलेला नाही, किंबहुना तो वाढतच आहे. प्रदूषणावर काढलेले जागतिक स्तरावरील हे उपाय त्यामुळेच वरवरचे म्हणजे तुटपुंजे आहेत.
विनाशकारी विज्ञान !
मनुष्याच्या या प्रगतीचा परिणाम म्हणजे आपल्या सर्वांच्या पुढ्यात वाढून ठेवलेले अंध:कारमय भविष्य होय. अमेरिकेच्या ‘नासा’ या जगप्रसिद्ध संघटनेने तिच्या संकेतस्थळावर यासंदर्भात महाभयानक परिस्थितीचे सूतोवाच केले आहेत. ‘नासा’च्या अहवालानुसार गेल्या २ सहस्र वर्षांत तापमानात एवढी वृद्धी झाली नसेल, जेवढी गेल्या ५० वर्षांत झाली. मनुष्याने निसर्गावर केलेल्या सातत्यपूर्ण आघातांमुळे ही जागतिक तापमानवाढ झाली. वर्ष २१०० पर्यंत पृथ्वीचे तापमान तब्बल ४.४ डिग्री सेल्सियसने वाढणार आहे. भारतातील समुद्रालगत असलेली १२ शहरे ३ फूट पाण्यात बुडणार आहेत. यांमध्ये भावनगर, मुंबई, मंगळुरू, चेन्नई यांसारख्या महत्त्वाच्या शहरांचाही समावेश आहे.
‘एकूणच गेल्या सहस्रावधी वर्षांत जे झाले नाही, ते पुढील ८० वर्षांत होईल’, असे नासाला यातून सांगायचे आहे. मनुष्याने निसर्गदेवतेला न जुमानल्याचाच हा परिपाक आहे. पाश्चात्त्यांच्या भांडवलशाहीची ही कटू फळे आहेत. ‘पैसा हा मनुष्याला सर्वकाही देऊ शकतो’, ही आत्मघाती मानसिकता या परिस्थितीस कारणीभूत आहे. मनुष्य स्थूलातून समृद्ध झाला; परंतु जीवनाचा समतोल गमावल्याने सुखी होण्याऐवजी दु:खीच होत गेला. यामागील मूळ कारण म्हणजे ज्या आनंदासाठी माणूस धडपडत राहिला, तो भौतिक जगात नसून आत्म्याच्या साक्षात्कारात आहे. २० व्या शतकातील महान संत रमण महर्षि यांनी म्हटले आहे, ‘आपण जगाला देऊ शकतो, अशी सर्वाेत्तम सेवा म्हणजे आपल्या स्वत:चा आत्मविकास साधणे होय.’ मनुष्य हे विसरला. व्यष्टी स्तरावर त्याला झालेला हा तोटा होय. त्याने निसर्गावर जे आघात केले आहेत, त्याचे समष्टी पापही त्याला लागले आहे. निसर्ग हा पंचमहाभूतांच्या माध्यमातून येणार्या काळात आपले रौद्ररूप दाखवील. हिंदु संस्कृती मानवी मनावर ‘मी सृष्टीला कृतज्ञताभावाने काय देऊ शकतो’, हा संस्कार करते, तर पाश्चात्त्य विचारसरणी ‘निसर्ग हा माझ्यासाठीच असून मी त्याला कसा ओरबाडू शकतो’, हा संस्कार करते. काहीही झाले, तरी ‘संयत् विकास करत आत्मविकास साधण्या’ची जी शिकवण हिंदु संस्कृतीने मानवाला दिली आहे, त्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होते. मानवाने आतातरी यातून बोध घ्यावा आणि न्यूनतम हानी होण्यासाठी साधना चालू करत स्वतःमध्ये विवेक निर्माण करावा, एवढीच नासाच्या अहवालाच्या निमित्ताने अपेक्षा !