वर्ष २१०० पर्यंत मुंबईसह भारताच्या किनारपट्टीवरील १२ शहरे पाण्याखाली जाणार !

विज्ञानाने केलेल्या तथाकथित प्रगतीचा परिणाम !

न्यूयॉर्क (अमेरिका) – अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या अहवालानुसार हवामान पालटाच्या संकटामुळे पुढील ८० वर्षांत म्हणजे वर्ष २१०० पर्यंत भारताच्या किनारपट्टीवरील मुंबईसह १२ शहरे ३ फुट पाण्यासाखाली जाण्याची शक्यता आहे. यात कांडला, ओखा, भावनगर, मुंबई, मंगळुरू, कोचीन, पारादीप, खिदीरपूर, विशाखापट्टणम, चेन्नई आणि तुतीकोरिन यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त समुद्र आणि नद्या यांजवळ असणार्‍या भूमींचे क्षेत्रफळ अल्प होणार आहे.

१. ‘नासा’च्या अहवालामध्ये म्हटले आहे की, वर्ष २१०० पर्यंत जगाचे तापमान लक्षणीय वाढेल. भविष्यात लोकांना कडक उन्हाचा सामना करावा लागेल. जर कार्बन उत्सर्जन आणि प्रदूषण थांबवले नाही, तर तापमान सरासरी ४.४ अंश सेल्सिअसने वाढेल. पुढील २ दशकांत तापमानात १.५ अंश सेल्सिअसने वाढ होईल. यामुळे हिमनद्या वितळतील, ज्याचे पाणी मैदानी आणि समुद्री भागात विनाश आणेल.

२. ‘नासा’ने ऑनलाईन ‘सी लेव्हल प्रोजेक्शन टूल’ (समुद्राच्या पातळीचा अंदाज घेणारे साधन) बनवले आहे. याद्वारे समुद्रकिनार्‍यांवर येणार्‍या आपत्तीपासून लोकांचे जीव वाचवणे शक्य होईल आणि त्यांची मालमत्ताही अन्य ठिकाणी हालवता येणे शक्य होईल. या ऑनलाईन साधनाद्वारे भविष्यातील आपत्तीची स्थिती म्हणजे वाढणारी समुद्राची पातळी जाणून घेता येईल.