कर्नाटकच्या अधिवक्त्यांची कणकुंबी (कर्नाटक) येथील कळसा धरणाला भेट
म्हादई पाणीतंटा प्रकरण
सांखळी, १० ऑगस्ट (वार्ता.) – म्हादर्ई नदीचे पाणी कर्नाटकने वळवले, या प्रश्नाविषयी पहाणी करण्यासाठी केंद्रीय जल समितीचे ओ.आर्.के. रेड्डी येत्या मासात कणकुंबी (कर्नाटक) येथील कळसा प्रकल्पाला भेट देणार आहेत. कर्नाटक राज्याने म्हादई नदीचे पाणी वळवले आहे, अशी तक्रार गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यासंबंधी रेड्डी या प्रकल्पाची पहाणी करून त्यांचा अहवाल देणार आहेत. या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्याचे अधिवक्ता अशोक चिकमठ आणि मोहन कतारकी यांनी ९ ऑगस्ट या दिवशी कणकुंबी येथील कळसा प्रकल्पाला भेट देऊन ३ वेगवेगळ्या स्थळांची पहाणी केली.
म्हादई प्रश्नाविषयी कर्नाटक राज्याने म्हटले आहे, ‘‘सर्वोच्च न्यायालयात याविषयीची सुनावणी चालू असतांना गोव्याने पूर्वी केलेली तक्रार ग्राह्य धरली जाऊ शकत नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांतील प्रतिनिधी असलेल्या निरीक्षण समितीने या प्रकल्पाचे निरीक्षण करून प्रत्येकाने आपापला अहवाल न्यायालयाकडे दिला आहे.’’
कोरोना महामारीमुळे म्हादई प्रश्नावर गोवा शासनाने पूर्वी न्यायालयात प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली नाही. आता ही सुनावणी २७ ऑगस्ट २०२१ या दिवशी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर गोवा शासनाने प्रविष्ट केलेली अवमान याचिका आणि ‘स्पेशल लिव्ह पिटीशन’ यांवर ८ सप्टेंबर २०२१ या दिवशी सुनावणी होण्याची शक्यता आहे.