पोलिसांना धिरयोंची (बैलांच्या झुंजींची) पूर्वकल्पना देऊनही बाणावली येथे ३ ठिकाणी धिरयोंचे आयोजन !

  • विशिष्ट अवैध गोष्टी वरिष्ठापर्यंत आणि पूर्वकल्पना देऊनही पोलीस रोखत नाहीत, याचा सरळ अर्थ ‘त्यांच्यावर राजकारण्यांचा दबाव असतो’, असा कुणी घेतल्यास वावगे काय ?
  • कायदे केवळ सर्वसामान्यांसाठी आहेत. ज्यांचे हात वरपर्यंत पोचले आहेत, त्यांना मनाप्रमाणे वागता येते, असे कुणाला वाटल्यास अयोग्य ठरू नये !

मडगाव, १० ऑगस्ट (वार्ता.)  – पूर्वी किती धिरयो (बैलांच्या किंवा रेड्यांच्या झुंजी) आयोजित केल्या होत्या आणि आता पुढे नियोजित असलेल्या धिरयो, तसेच याचा प्रसार करण्यास वापरलेली सामाजिक प्रसारमाध्यमे यांविषयीची माहिती देऊन त्या रोखण्याविषयीचे विनंतीपत्र ‘पीपल फॉर ॲनिमल्स’ या संघटेनेने कोलवा आणि वेर्णा पोलीस ठाण्यांमध्ये दिले होते. असे असतांनाही सोमवार, ९ ऑगस्ट २०२१ या दिवशी बाणावली येथे ३ ठिकाणी धिरयो आयोजित करण्यात आल्या होत्या.

‘पीपल फॉर ॲनिमल्स’ या संघटेनेने पोलीस ठाण्यांमध्ये दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, १४ ऑगस्ट २०२१ या दिवशी येथील एका प्रमुख राजकारण्याच्या नातेवाईकाच्या वाढदिवसानिमित्त वार्का येथे ५ धिरयोंचे आयोजन करण्यात आले आहे. पोलिसांनी यासंबंधी चौकशी करून त्या थांबवाव्यात. ‘प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स ॲक्ट, १९६०’ या कायद्यानुसार बैलांच्या धिरयो आयोजित करणे अवैध आहे. वर्ष १९९७ मध्ये उच्च न्यायालयाने गोव्यात धिरयो आयोजित करण्यास बंदी घातली आहे.

या विनंतीअर्जाची प्रत पोलीस महासंचालकांचे मुख्य सचिव, पशूसंवर्धन खात्याचे संचालक आणि दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आली आहे. ‘या प्रकरणी कारवाई न केल्यास उच्च न्यायालयात जाऊ’, अशी चेतावणी पीपल फॉर ॲनिमल्स संघटनेने दिली आहे.