सातारा शहरातील काही भागांतील रस्त्यावरील बुजवलेले खड्डे पुन्हा उखडले !
काही मासही झालेले नसतांना रस्त्यावरील खड्डे पुन्हा उखडले जाणे गंभीर आहे. शासनाने या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांकडून पैसे वसूल करावेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, हीच जनतेची अपेक्षा ! – संपादक
सातारा, ११ ऑगस्ट (वार्ता.) – शहरातील रस्त्यांवर पावसाळ्यापूर्वी खड्डे पडले होते. ते बुजवण्यासाठी सातारा नगरपालिकेने ५ निविदा काढल्या होत्या. त्यासाठी १० लाख रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला होता. त्या निधीतून हे खड्डे बुजवण्यात आले; मात्र मुरुम टाकून तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवल्यामुळे काही खड्डे पुन्हा उखडले आहेत. यामुळे खड्डे बुजवण्यासाठी नगरपालिकेने वापरलेले जनतेचे १० लाख रुपये व्यर्थ गेले आहेत, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
सातारा नगरपालिका पावसामुळे पडलेले खड्डे बुजवण्यासाठी प्रतिवर्षी राखीव निधी ठेवते. पावसाळ्यात खड्डे बुजवण्यासाठी उपयोगात आणली जाणारी यंत्रणा या वेळी उपयोगात आणली गेली नाही. गेल्या आठवड्यात शाहू चौक ते चार भिंती, समर्थ मंदिर ते राजवाडा, समर्थ मंदिर ते शाहू चौक आदी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात आले; मात्र यातील काही खड्डे पुन्हा उखडले आहेत.