लोकांनी अधिक संख्येने एकत्र येऊन साजरे केले जाणारे कार्यक्रम किंवा समारंभ टाळावे ! – डॉ. उत्कर्ष बेतोडकर
मडगाव, १० ऑगस्ट (वार्ता.) – लोकांनी अधिक संख्येने एकत्र येऊन साजरे करण्यात येणारे घरगुती कार्यक्रम किंवा समारंभ टाळावे, असे आवाहन राज्याचे साथीच्या रोगाचे तज्ञ डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी केले आहे. मडगाव येथे जागतिक आदिवासी दिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘जर लोकांनी कोरोनाविषयीची मार्गदर्शक तत्त्वे पाळली नाहीत, तर कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढू शकते. मुख्यतः वाढदिवस, विवाह आदी कार्यक्रमांत एकत्र येतांना सामाजिक अंतर न पाळणे, एकमेकांशी हस्तांदोलन करणे, हा चिंतेचा विषय आहे. जरी आज गोव्यात प्रतिदिन सरासरी १०० कोरोनाचे रुग्ण सापडत असले, तरी कोरोनाची मार्गदर्शक तत्त्वे न पाळण्याची ही वेळ नाही. आम्ही काही मासांपूर्वी पाहिले की, फेब्रुवारी २०२१ मध्ये गोव्यात प्रतिदिन सरासरी ३० रुग्ण होते आणि कोरोनामुळे होणार्या मृत्यूंचे प्रमाण शून्य होते; परंतु नंतर पुढच्या मासाभरात कोरोना रुग्णांची संख्या १ सहस्र आणि त्याच्या पुढच्या १५ दिवसांत ४ सहस्र झाली, तसेच कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या ७० च्या वर गेली. दुसरी लाट येण्यास आपणच कारणीभूत आहोत. मडगाव, पणजी, फोंडा आणि वास्को या शहरांत कोरोनाचे प्रमाण वाढले, तर कोरोना खेड्यात पसरायला वेळ लागणार नाही.
जर एखादी व्यक्ती कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेली असेल, तर त्याने निष्काळजीपणा न करता त्वरित चाचणी करून घ्यावी. जर आपण कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले, तर सप्टेंबर मासामध्ये एखादी सौम्य लाट येईल. मलेरिया, डेंग्यू आदी साथीच्या रोगांप्रमाणेच आपल्याला कोरोनासमवेत जगायचे आहे. कोरोनाच्या तिसर्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्यशासन सिद्ध आहे. बालरुग्णांसह सर्वांसाठी योग्य प्रमाणात खाटांची सिद्धता केली आहे. कोरोनाची साथ टाळणे हे केवळ शासनाचे नव्हे, तर प्रत्येक नागरिकाचे दायित्व आहे. शासनासमवेत प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे.’’