राज्यातील मंदिरे उघडण्याविषयी ‘टास्क फोर्स’च्या बैठकीत चर्चा नाही
मुंबई – राज्यातील कोरोनाच्या स्थितीविषयी १० ऑगस्ट या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘टास्क फोर्स’च्या सदस्यांसमवेत महत्त्वपूर्ण बैठक झाली. ९ ऑगस्ट या दिवशी जनतेशी ‘ऑनलाईन’ संवाद साधतांना उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मंदिरे उघडण्याविषयी लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे म्हटले होते. त्या अनुषंगाने ‘टास्क फोर्स’च्या बैठकीत याविषयी निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती; मात्र याविषयी कोणताही निर्णय या बैठकीत घेण्यात आला नाही.
या बैठकीविषयी माहिती देतांना मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले, ‘‘राज्यातील सर्व सुविधा टप्प्याटप्प्याने चालू करण्यात येणार आहेत. शासनाला थोडी संधी द्यायला हवी. ‘टास्क फोर्स’च्या बैठकीत राज्यातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट यांची वेळ रात्री १० वाजेपर्यंत वाढवण्याविषयी चर्चा झाली. येत्या ८ दिवसांत याविषयीचा अंतिम निर्णय घेण्यात येईल.’’