शांत, हसतमुख, इतरांना साहाय्य करणार्या गडहिंग्लज येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. संगीता कडूकर !
शांत, हसतमुख, इतरांना साहाय्य करणार्या आणि गुरुदेवांप्रती भाव असणार्या गडहिंग्लज (कोल्हापूर) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. संगीता कडूकर (वय ४९ वर्षे) !
कोल्हापूर येथील साधिका सौ. संगीता कडूकर यांच्याविषयी तेथील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
१. हसतमुख
‘सौ. संगीताकाकू नेहमी हसतमुख आणि उत्साही असतात.
२. शांत
मी आजपर्यंत काकूंना कधीही कुणाशी रागावून बोलतांना पाहिले नाही.
३. नियोजनकौशल्य
काकूंमध्ये नियोजनकौशल्य हा गुण असल्याने त्यांनी व्यवहारातील कृतींच्या समवेतच त्यांच्या सेवेची घडी योग्य प्रकारे बसवली आहे. त्यांच्यातील नियोजनकौशल्यामुळे त्यांनी त्यांचे नातेवाईक आणि सर्व साधक यांनाही जोडून ठेवले आहे.
४. प्रेमभाव
अ. काकू त्यांच्या सासूबाईंवर आईप्रमाणे प्रेम करतात आणि त्यांची काळजी घेतात.
आ. त्या गडहिंग्लज येथून सेवाकेंद्रात येतांना सेवाकेंद्रातील साधकांसाठी वेगवेगळा खाऊ बनवून आणतात.’
– सौ. विजया वेसणेकर, कोल्हापूर
इ. ‘काकूंशी बोलतांना ‘त्या आपल्या आईच आहेत’, असे वाटते.’ – सौ. संगीता पाटील
ई. ‘काकूंमधील प्रेमभावामुळे सत्संगात सर्व साधक त्यांना मोकळेपणाने अडचणी किंवा प्रश्र विचारतात आणि काकूही त्यांना प्रेमाने सर्व सांगतात.’ – सौ. वैष्णवी साळोखे
५. इतरांना साहाय्य करणे
अ. ‘त्यांना व्यष्टी साधना किंवा समष्टी सेवा यांविषयी कधीही भ्रमणभाष केला आणि त्या सेवेत व्यस्त असल्या, तरीही त्या वेळ काढून साधकांना साहाय्य करतात. त्या शांतपणे साधकांच्या अडचणी समजून घेतात. त्यामुळे त्यांच्याशी बोलल्यानंतर साधकांचे मन हलके होते आणि साधकांना साधनेसाठी योग्य दिशा मिळते.’
– सौ. अनिता करमळकर आणि सौ. संगीता पाटील
आ. ‘दळणवळण बंदीच्या काळात समाजातील व्यक्ती सनातनच्या ग्रंथांची मागणी करत होत्या तेव्हा ‘आपल्याकडे कुठले ग्रंथ उपलब्ध आहेत ?’, ते पाहून ‘त्या ग्रंथांविषयी जिज्ञासूंना सांगून त्या ग्रंथांची मागणी आपण घेऊ शकतो’, असे काकूंनी आम्हाला सांगितले. त्यांनी आम्हाला मागणीची नोंद करण्याची कार्यपद्धत समजावली. त्यांच्या सांगण्यात इतकी सहजता असते की, ‘आपल्याला कुठलीही अडचण आली, तर आपण लगेच काकूंना विचारून घेऊ शकतो’, असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे सेवेत साधकांचा प्रतिसाद आणि सहभागही फार चांगला असतो.’
– सौ. वैष्णवी साळोखे
६. तत्त्वनिष्ठ
अ. ‘एखादा साधक कुठे अडकला आहे ? कुठल्या स्वभावदोषांमुळे तो मागे पडत आहे ?’, हे लक्षात घेऊन काकू तत्त्वनिष्ठ राहून त्याला साहाय्य करतात.’ – सौ. विजया वेसणेकर
आ. ‘आमच्याकडून सेवेत काही चुका झाल्यास काकू परखडपणे आमच्या चुका सांगतात. ‘आमचे कुठले स्वभावदोष आणि अहं उफाळून येत आहेत ?’, याचा त्या आम्हाला अभ्यास करायला सांगतात.’ – सौ. उमा किशोर ठोमके, कोल्हापूर
७. ‘साधकांची साधना व्हावी’, अशी तळमळ
अ. ‘सर्वांनी व्यष्टी साधनेचा आढावा सौ. कडूकर यांना द्यायचा आहे’, असे कळल्यावर आधी ‘मला जमेल का ?’, असा विचार माझ्या मनात आला. काकूंनी प्रत्यक्ष आढावा घेतल्यावर ‘त्यांचा प्रत्येक सूत्राचा अभ्यास, तत्त्वनिष्ठता पाहून, तसेच श्रद्धा आणि भाव वाढण्यासाठी त्यांनी करायला सांगितलेले प्रयत्न, तसेच पुढील आठवड्यात करायचे प्रयत्न’ याविषयी इतक्या तळमळीने सांगितले की, ‘काकूंच्या माध्यमातून साक्षात् गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) ‘आमच्या व्यष्टी साधनेची घडी बसवून देत आहेत’, असे मला वाटले.
आ. ‘त्यांना व्यष्टी साधनेचा आढावा दिल्यावर माझे मन हलके झाले’, असे मला अनुभवता आले आणि ईश्वरी चैतन्याची मला अनुभूती आली. गुरुमाऊली, हे सर्व मला केवळ तुमच्या कृपेनेच अनुभवता आले. यासाठी अनंत कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. उमा किशोर ठोमके
८. आध्यात्मिक मैत्रीण
‘काकू माझ्या आध्यात्मिक मैत्रीण आहेत. मला कुठलीही अडचण आल्यास मी त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलते. त्यांच्याकडून मला जो दृष्टीकोन मिळतो, त्यामुळे मला अडचणीतून बाहेर पडायला साहाय्य होते. मला आलेली अडचण त्यांना कधी सांगितली नाही, तर त्या ती ओळखतात आणि स्वतःहून मला त्याविषयी विचारतात.’- सौ. विजया वेसणेकर
९. भावपूर्ण बोलणे
‘त्या सेवेविषयीची सूत्रेही इतक्या भावपूर्णपणे सांगतात की, ‘तो भावसत्संगच असून ती सूत्रे ऐकतच रहावी’, असे सर्वांना वाटते.’
– सौ. संगीता पाटील आणि सौ. विजया वेसणेकर (ऑगस्ट २०२०)