परात्पर गुरु डॉक्टरांवर अपार श्रद्धा असलेल्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या हडपसर, पुणे येथील सौ. चित्रा अनिल नाकील !
कोणतीही सेवा करण्यास आनंदाने सिद्ध होणार्या आणि परात्पर गुरु डॉक्टरांवर अपार श्रद्धा असलेल्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या हडपसर, पुणे येथील सौ. चित्रा अनिल नाकील (वय ५९ वर्षे) !
हडपसर, पुणे येथील सौ. चित्रा अनिल नाकील मागील २१ वर्षांपासून सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करत आहेत. त्या प्रसार करणे, धर्मशिक्षण वर्ग घेणे, प्रवचन घेणे आदी सेवा करतात.
१. नवीन शहरात रहाण्यास आल्यावर येणार्या अडचणींवर तळमळीने मात करणे
‘नाकीलकाकू संभाजीनगरहून पुण्यात आल्या आहेत. पुण्यासारख्या मोठ्या शहरात आल्यानंतर प्रारंभी त्यांना येथील परिस्थितीशी जुळवून घेण्यास वेळ लागला. हडपसर भागात काकूंचे घर एका बाजूला आहे. तेथून प्रसारकार्याच्या ठिकाणी येणे, नवीन रस्ते शोधणे, या सर्व अडचणींवर त्यांनी तळमळीने मात केली.’
– सौ. मनीषा पाठक, पुणे (६८ टक्के आध्यात्मिक पातळी)
२. प्रेमभाव
‘नाकीलकाकूंनी २ वर्षे हडपसरमध्ये हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या वेळी भोजन-व्यवस्थेची सेवा अत्यंत प्रेमाने केली. त्यामुळे सर्व साधक त्यांना ‘अन्नपूर्णा’, अशी हाक मारतात. अनेक वेळा मी त्यांना ‘आई’, अशी हाक मारते. त्यांच्यातील प्रेमभावामुळे त्यांच्याशी जवळीक होऊन मला मोकळेपणाने बोलता येते. त्या नेहमी साधकांना विविध पदार्थ आवडीने आणि प्रेमाने खाऊ घालतात.’ – सौ. रीमा नान्नीकर
३. सेवाभाव
३ अ. कोणत्याही सेवेला सिद्ध असणे : ‘काकूंना कोणतीही सेवा सांगितली, तर त्या कधीही ‘नाही’, म्हणत नाहीत. प्रवचन घेणे, भ्रमणभाषवर संपर्क करणे, भोजन व्यवस्थेची सेवा, साधकांना डबा करून देणे, वितरण कक्ष लावणे इत्यादी सर्व सेवा त्या दायित्व घेऊन भावपूर्णरित्या करतात.
– सौ. छाया राऊत, हडपसर
३ आ. सेवा भावपूर्ण करणे : ‘पुष्कळ वेळा काकूंच्या घरी गुरुपौर्णिमेविषयी कार्यशाळा, परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या जन्मोत्सव सोहळ्याचे प्रक्षेपण अशा कार्यक्रमांचे नियोजन असते. त्या वेळी त्यांच्याकडे खोलीची शुद्धी करणे, रांगोळी काढणे, पूजा करणे इत्यादी सेवांचे दायित्व असायचे. काकू या सेवा अत्यंत भावपूर्ण, तळमळीने आणि मनापासून करतात. त्यांनी केलेली पूजेची सिद्धता पाहून साधकांची भावजागृती होते.’ – सौ. रीमा नान्नीकर
३ इ. गुडघेदुखीचा त्रास असूनही आनंदाने सेवा करणे : ‘काकूंना गुडघेदुखीचा त्रास असूनही हडपसर केंद्रातील सभेच्या वेळी त्या घरातील कामे करून, नातवाला काही वेळ सांभाळून अन्नपूर्णा कक्षातील सेवेला येत. त्या भोजनव्यवस्थेत अखंड सेवारत असायच्या आणि पुष्कळ आनंदाने अन् तळमळीने सेवा करायच्या.’ – सौ. रीमा नान्नीकर आणि सौ. मनीषा पाठक
४. गुरुदेवांवरील श्रद्धेमुळे ‘कोरोना’ महामारीच्या काळातही साधिकेसमवेत रुग्णालयात रहाणे
‘कोरोना’ महामारीच्या काळात पुण्यात एका साधिकेची प्रसूती झाली. तेव्हा काकू तिच्यासमवेत रुग्णालयात रहाण्यास गेल्या होत्या. तेव्हा त्यांच्या मनात कुठलीही भीती नव्हती. ‘कोरोना’ महामारीच्या काळात मी रुग्णालयात राहिले, तर मला काही होईल का ?’, असा कोणताच विचार त्यांच्या मनात नव्हता. ‘गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) काळजी घेणारच आहेत’, अशी त्यांची श्रद्धा होती.’ – सौ. मनीषा पाठक
५. भाव
५ अ. संतांप्रती भाव : ‘सद्गुरु (कु.) स्वाती खाडये पुणे येथे आल्या की, त्यांच्यासाठी अल्पाहार आणि महाप्रसाद बनवणे या सेवा काकू भावपूर्णरित्या करतात. संतसेवा मिळाली की, त्यांना पुष्कळ कृतज्ञता वाटते.’ – सौ. छाया राऊत
५ आ. साधकांप्रती भाव : ‘साधकांसाठी भोजन बनवतांना ‘साक्षात अन्नपूर्णामाताच माझ्याकडून सेवा करवून घेत आहे’, असा त्यांचा भाव असतो. गुरुदेवांच्या कृपेने मिळालेल्या सेवेविषयी बोलतांना त्यांची भावजागृती होते.
५ इ. कृतज्ञताभाव : संभाजीनगर येथील काही पूर्णवेळ साधिका त्यांच्या घरी रहाण्यासाठी आल्या होत्या. त्या वेळी गुरुदेवांच्या कृपेने पूर्णवेळ साधकांच्या सेवेची संधी मिळाली, याविषयी त्यांना कृतज्ञता वाटत होती.’
– सौ. मनीषा पाठक
६. सौ. नाकीलकाकूंमध्ये जाणवलेले पालट
अ. ‘पूर्वी त्यांचे प्रयत्न वरवरचे असायचे; परंतु आता त्या मनापासून आणि भावपूर्ण प्रयत्न करतात. त्या स्वतःकडून होत असलेल्या चुका मोकळेपणाने आणि प्रांजळपणे सांगतात. ’
– सौ. रीमा नान्नीकर
आ. ‘काकूंच्या व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांमध्ये सातत्य आले आहे. पूर्वी त्यांना चूक सांगितल्यावर भावनाशीलतेमुळे वाईट वाटून ‘प्रतिमा जपणे’ यामुळे रडू यायचे. आता काकूंमध्ये स्थिरता जाणवते.’ – सौ. मनीषा पाठक
इ. ‘काकूंनी घरातील कामे करून व्यष्टी साधना आणि सेवा यांची घडी बसवली आहे. त्या कोणतीही सवलत घेत नाहीत.
ई. आता काकूंना चुका सांगितल्या, तर त्या लगेच स्वीकारतात.’ – सौ. छाया राऊत, हडपसर, पुणे. (जून २०२०)