चंद्रपूर येथे दुकानात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेशमूर्ती आढळल्यास १० सहस्र रुपयांचा दंड !
दुकान ‘सील’, अनामत रक्कम जप्त आणि दुकानावर २ वर्षे बंदी यांसह ‘प्रदूषण नियंत्रण कायद्या’नुसार फौजदारी कारवाई केली जाणार !
|
चंद्रपूर – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात सिद्धता चालू असतांनाच केंद्र सरकारने श्री गणेशाच्या ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तींवर बंदी घातली आहे. त्यानुसार ‘शहरामध्ये ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेशमूर्तींची निर्मिती, आयात, साठा आणि विक्री होऊ नये, यासाठी कठोर कारवाई करण्यात येणार आहे. गणेशमूर्तींच्या दुकानात तशा प्रकारच्या मूर्ती आढळल्यास १० सहस्र रुपयांचा दंड लागू करणे, दुकान ‘सील’ करणे, अनामत रक्कम जप्त करणे आणि दुकानावर २ वर्षे बंदी लादणे यांसह प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार फौजदारी कारवाई केली जाईल’, असे आदेश येथील महापालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी दिले आहेत.
‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेशमूर्तीवर बंदी घालण्याच्या संदर्भात शहरातील मूर्तीकारांची महानगरपालिकेच्या इमारतीत बैठक झाली. बैठकीत ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तींवरील बंदीच्या संदर्भात मूर्तीकार प्रतिनिधींच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या. केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार महानगरपालिका क्षेत्रात या मूर्तींवर पूर्णतः बंदी रहाणार आहे, असे या वेळी घोषित करण्यात आले.