घाटकोपर (मुंबई) येथे राष्ट्रध्वज छापलेल्या ‘टी-शर्ट’ची विक्री हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर दुकानदारांनी थांबवली !
-
राष्ट्रध्वजाच्या अवमानाकडे प्रशासन आणि पोलीस यांचे दुर्लक्ष !
-
राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याचा प्रयत्न करणारे हिंदु जनजागृती समितीचे श्री. बळवंत पाठक यांचे अभिनंदन !
मुंबई, १० ऑगस्ट (वार्ता.) – ‘राष्ट्रीय मानचिन्हांचा अपवापर रोखणे कायदा १९५०’ चे कलम २ आणि ५, तसेच ‘राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम १९७१’चे कलम २ आणि ‘बोधचिन्ह अन् नाव (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम १९५०’ या तीन कायद्यांनुसार राष्ट्रध्वजाचा अवमान हा दंडनीय अपराध आहे. असे असतांना घाटकोपर येथील बाजारामध्ये काही दुकाने आणि फिरते विक्रेते यांच्याकडून राष्ट्रध्वज छापलेल्या ‘टी-शर्ट’ची विक्री करण्यात येत होती. ९ ऑगस्ट या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे मुंबई जिल्हा समन्वयक श्री. बळवंत पाठक यांनी दुकानदार आणि पादचारी मार्गावरील विक्रेते यांचे प्रबोधन केल्यानंतर त्यांनी राष्ट्रध्वज छापलेल्या ‘टी-शर्ट’ची विक्री थांबवली.
श्री. बळवंत पाठक हे त्यांच्या कामानिमित्त घाटकोपर येथे गेले असतांना तेथील पादचारी मार्गावरील एका कपडे विक्रेत्याने अशा प्रकारचे ‘टी-शर्ट’ विक्रीला ठेवले असल्याचे त्यांना आढळले. श्री. पाठक यांनी त्या विक्रेत्याचे प्रबोधन केल्यावर त्यांनी विक्रीला ठेवलेले ‘टी-शर्ट’ काढून ठेवले. तेथून काही अंतरावर असलेल्या अन्य एका दुकानामध्येही अशाच प्रकारे ‘टी-शर्ट’ विक्रीला ठेवण्यात आले होते. श्री. पाठक यांनी त्या दुकानाच्या मालकांचेही प्रबोधन केले; मात्र दुकानदाराने त्यांचा हेतू राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा नसल्याचे सांगितले. या वेळी श्री. पाठक यांनी राष्ट्रध्वजाप्रमाणे असलेले ‘टी-शर्ट’ परिधान केल्याने घामामुळे त्याला दुर्गंध येणे, मळ लागणे यांतून नकळतपणे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो, हे दुकानदाराच्या लक्षात आणून दिले. त्यावर दुकानदाराने घेतलेल्या ‘टी-शर्ट’ची विक्री करीन; मात्र यापुढे असे राष्ट्रध्वजाप्रमाणे असणारे ‘टी-शर्ट’ विक्रीसाठी मागवणार नाही’, असे सांगितले. प्रत्यक्षात थोड्या वेळाने पाहिल्यानंतर दुकानदाराने विक्रीसाठी लावलेले ‘टी-शर्ट’ काढून ठेवले असल्याचे श्री. पाठक यांना दिसून आले.
पोलीस आणि प्रशासन यांची राष्ट्रध्वजाच्या विडंबनासंदर्भातील अनास्था !
प्रतिवर्षी राष्ट्रीय सणांच्या दिवशी जिल्हा प्रशासनाकडून प्रत्येक पोलीस ठाण्याला राष्ट्रध्वजाचा अवमान करणार्यांवर कारवाई करण्याचे परिपत्रक पाठवण्यात येते. सरकारकडूनही तसे आवाहन करण्यात येते. त्यामुळे अशा प्रकारे ‘टी शर्ट’, ‘मास्क’ यांची विक्री पोलीस आणि प्रशासन यांनी स्वत:हून रोखणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र पोलीस आणि प्रशासन यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. (अशा कर्तव्यचुकार पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यावर कारवाई व्हायला हवी, असेच राष्ट्रप्रेमी जनतेला वाटते ! – संपादक)