मुलीच्या शोधासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा पोलीस ठाण्यासमोर निषेध मोर्चा !
नगर येथील अल्पवयीन मुलीला धर्मांधाने पळवून नेल्याचे प्रकरण
श्रीरामपूर (नगर), १० ऑगस्ट – बेलापूर (जिल्हा नगर) येथील एका अल्पवयीन मुलीला २३ जुलै या दिवशी आयुब शेख नावाच्या तरुणाने खोटे आमीष दाखवून पळवून नेले. या प्रकरणी येथील शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद झाला आहे. या घटनेला ९ ऑगस्ट या दिवशी १७ दिवस उलटूनही पोलिसांना अद्याप कुठलाही शोध लागलेला नाही. त्यामुळे शहरातील हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक झाल्या असून ९ ऑगस्ट या दिवशी सकाळी ११ वाजता येथील मुख्य रस्त्यावरून गांधी पुतळ्यामार्गे घोषणा देत, शहर पोलीस ठाण्यासमोर निषेध मोर्चा काढण्यात आला, तसेच या वेळी संबंधित आरोपीच्या कुटुंबियांना कह्यात घेऊन सखोल चौकशी करण्याची मागणी मुलीच्या आईने पोलीस प्रशासनाकडे केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना ते लक्षात येत नाही का ? – संपादक)
या संदर्भात हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी निषेध नोंदवून पोलीस निरीक्षक संजय सानप यांना निवेदन दिले. पोलीस प्रशासनाने सदर मुलीचा तातडीने शोध घेऊन तिला पळून नेणार्या आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.