आधुनिक वैद्य (डॉ.) नितीन कोठावळे (वय ५९ वर्षे) यांच्या आजारपणाच्या वेळी, त्यांच्या मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती
‘२९.६.२०२१ या दिवशी नवे पारगाव (तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर) येथील सनातनचे साधक आधुनिक वैद्य (डॉ.) नितीन कोठावळे यांचे निधन झाले. त्यांच्याविषयी त्यांची पत्नी आधुनिक वैद्या (डॉ.) श्रीमती शिल्पा कोठावळे यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. सनातन संस्थेशी संपर्क आणि केलेली सेवा
१ अ. कोठावळे दांपत्याने साधनेला आरंभ केल्यानंतर त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभणे आणि ‘जीवनात जे मिळवायचे आहे, ते या मार्गातूनच मिळू शकेल’, याची त्यांना निश्चिती वाटणे : ‘वर्ष १९९९ मध्ये मी आणि माझे पती आधुनिक वैद्य नितीन प्रभाकर कोठावळे, दोघेही सनातन संस्थेच्या संपर्कात आलो. आमच्या साधनेच्या प्रवासाला सोलापूरमध्ये आरंभ झाला. काही दिवसांतच देवाच्या कृपेने आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग मिळाला. आम्हाला त्यांच्यासह रहाण्याची संधी मिळाली आणि आमचा आयुष्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन पूर्ण पालटून गेला. पुढे आम्ही दोघांनी सेवेला आणि साधनेला आरंभ केला. सनातन संस्थेच्या कुटुंबामध्ये आम्ही समरस होऊन गेलो. आम्हाला अनेक संत आणि साधक यांचा सहवास लाभला. त्यामुळे काही दिवसांतच आम्हाला जाणीव झाली, ‘या जीवनात जे मिळवायचे आहे, ते या मार्गातूनच मिळू शकेल.’
१ आ. साधिकेच्या यजमानांनी (आधुनिक वैद्य (डॉ.) कोठावळे यांनी) आरंभी प्रसारसेवा करणे आणि त्यानंतर शेवटपर्यंत ‘सोशल मिडिया’ची सेवा करणे : वर्ष २००६ मध्ये आम्ही सोलापूरहून नवे पारगाव (तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर) येथे आलो. वर्ष २००९ पासून माझे यजमान आधुनिक वैद्य (डॉ.) कोठावळे हळूहळू प्रसारसेवा करू लागले. वर्ष २०१८ पासून त्यांची ‘सोशल मिडिया’ची सेवा चालू झाली. त्यांची ती सेवा शेवटपर्यंत चालू होती.
२. साधिकेला तिच्या यजमानांच्या आजारपणात जाणवलेली सूत्रे
२ अ. आजाराचा आरंभ : मे आणि जून २०२० पासून यजमानांना हळूहळू ‘थोडे वजन घटणे आणि अधूनमधून ताप येणे’, असे त्रास होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ते स्वतः नाक-कान-घसा तज्ञ होते. त्यामुळे त्यांनी प्रथम किरकोळ उपचार चालू केले.
२ आ. साधिकेच्या यजमानांना कर्करोग झाल्याचे निदान होणे : जून २०२० च्या शेवटच्या आठवड्यात त्यांच्या मानेमध्ये पुढे आणि मागे गाठी वाढत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दुसर्या दिवशी जाऊन ‘स्कॅन’ केले आणि ‘त्यांना ‘नॉन हॉजकिंस लिम्फोमा’ नावाचा कर्करोग झाला आहे’, असे निदान झाले. या आजारामध्ये रक्तातील पेशी न्यून होतात आणि शरिरातील ‘लिम्फ नोड्स’वर (लसिका ग्रंथींवर) परिणाम होतो.
२ इ. साधिकेच्या यजमानांना आजार झाल्याचे समजल्यावर त्यांनी स्थिर राहून त्याविषयी सर्व अभ्यास करणे : आजार झाल्याचे समजल्यावर यजमान स्थिर होते. त्यांनी काही दिवसांतच या आजाराविषयीचा सर्व अभ्यास केला. गुरुदेवांच्या कृपेने आम्हाला पहिल्यापासून नामजपादी उपायांविषयी मार्गदर्शन आणि सद्गुरु अन् संत यांचा आधार लाभला. ‘प.पू. गुरुदेव आपल्या समवेत आहेत’, यावर त्यांची श्रद्धा होती. कर्करोग तज्ञांनी सांगितले होते, ‘‘वैद्यकशास्त्रानुसार हा आजार पूर्ण बरा होण्याचे प्रमाण २० ते २५ टक्के आहे.’’ आजाराच्या आरंभापासून यजमानांनी ‘आपल्याला हा आजार झालेला आहे आणि आता उपचार करायचे आहेत’, हे स्वीकारले होते.
२ ई. ‘किमोथेरपी’ चालू असतांना साधिकेच्या यजमानांच्या फुप्फुसांना आणि नंतर कानाला जंतूसंसर्ग होऊन त्यांना तीव्र वेदना होणे : ‘किमोथेरपी’ झाल्यावर काही दिवसांनी त्यांना ‘न्यूमोनाइटिस’ (फप्फुसांना जंतूसंसर्ग) झाला. त्याच्या वेदना इतक्या तीव्र होत्या की, त्यांना श्वास घेणे आणि हालचाल करणे अतिशय कठीण जात होते. डिसेंबर २०२० मध्ये ‘किमोथेरपी’नंतर त्यांच्या कानाला गंभीर जंतूसंसर्ग झाला. त्यांना त्याच्याही वेदना तीव्र होत होत्या. त्या वेळी त्यांना पुष्कळ त्रास झाला. ‘मेंदूपर्यंत जंतूसंसर्ग होऊ नये’, यासाठी त्यांना ३ आठवडे शिरेतून ‘इंजेक्शन’ चालू होते.
२ उ. जानेवारी २०२१ मध्ये त्यांची ‘किमोथेरपी’ची सर्व ‘सायकल्स’ पूर्ण झाली होती; पण काही दिवसांतच त्यांचा मूळ आजार सर्व लक्षणांसहित पुन्हा उद्भवला.
२ ऊ. मार्च २०२१ पासून मृत्यूपर्यंत साधिकेच्या यजमानांना विविध शारीरिक त्रास होणे : मार्च मासापासून त्यांच्या आतड्यांना आजार होऊन मूळ आजारामुळे आतडे पोखरले गेले. त्यामुळे त्यांचा आहार अगदी न्यून झाला. त्यांना ‘रक्तातील प्रथिनांचे प्रमाण अगदी न्यून होणे आणि नंतर पोटात पाणी होणे’, असे शारीरिक त्रास झाले.
शेवटच्या मासांमध्ये त्यांना विविध प्रकारचे शारीरिक त्रास होत होते. त्यांच्या शरिराला अनेक मास अखंड खाज सुटत होती. त्यांना २ मास सतत ताप येत होता. त्यामुळे त्यांचे शरीर पिळवटून निघायचे. त्यांच्या एका पायाच्या बोटांना अकस्मात् रक्तपुरवठा न्यून होऊन तिथे तीव्र वेदना निर्माण झाल्या. या सर्व स्थितीमुळे त्यांना ‘झोप न येणे आणि भूक न लागणे’, असे अनेक त्रास होत होते.
२ ए. यजमानांना त्रास होत असतांना प्रत्येक वेळी सद्गुरु आणि संत त्यांच्यासाठी नामजपादी उपाय सांगत होते, तसेच काही साधक यजमानांसाठी नामजप करत होते.
२ ऐ. सद्गुरु (कु.) स्वाती खाडयेताईंच्या आधारामुळे मला ‘देव समवेत आहे’, याची प्रचीती सतत येत होती.
२ ओ. आलेल्या अनुभूती
२ ओ १. साधिकेच्या यजमानांच्या निधनाच्या १० दिवस आधी पू. भाऊ (सदाशिव) परब घरी येणे आणि ‘त्यांच्या रूपात प.पू. गुरुदेवच आले आहेत’, असे वाटून साधिकेची भावजागृती होणे : यजमानांच्या निधनापूर्वी साधारण १० दिवस आधी अकस्मात् सनातनचे २६ वे संत पू. भाऊ (सदाशिव) परबकाका (वय ८० वर्षे) घरी आले. त्या वेळी ‘त्यांच्या रूपात प.पू. गुरुदेवच आले आहेत’, असे मला वाटत होते. यजमानांना भेटल्यावर पू. काकांनी त्यांची अतिशय प्रेमाने विचारपूस केली आणि नंतर त्यांच्यासाठी प्रार्थनासुद्धा केली. पू. काकांचा निरोप घेतांना यजमान म्हणाले, ‘‘गुरुदेवांच्या कृपेनेच तुम्ही आलात.’’ हे सर्व पाहून माझी भावजागृती होऊन मला कृतज्ञता वाटत होती.
२ ओ २. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधिकेच्या यजमानांसाठी एक उपाय करायला सांगणे आणि त्या तो उपाय करण्यापूर्वी करायची प्रार्थना सांगत असतांना ‘साक्षात् श्री महालक्ष्मीदेवीच प्रार्थना करत आहे अन् त्या प्रार्थनेचा यजमानांवर सकारात्मक परिणाम होत आहे’, असे जाणवणे : वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी यजमानांचे त्रास इतके वाढले की, त्यांनी मला बोलावून सांगितले, ‘‘मला असे वाटते की, मला काही शक्तींनी धरून ठेवले आहे. त्यामुळे माझी सुटका होत नाही. महामृत्युंजय जप लावण्याविषयी तू विचारून घेतेस का ?’’ त्यांनी मला हे विचारल्यावर माझी स्थिती थोडी बिघडली. थोड्या वेळानंतर मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा भ्रमणभाष आला. त्यांनी मला यजमानांसाठी एक उपाय करायला सांगितला आणि तो उपाय करण्यापूर्वी प्रार्थना करायला सांगितली. त्या मला ती प्रार्थना भ्रमणभाषवरून सांगत असतांना ‘साक्षात् श्री महालक्ष्मीदेवीच प्रार्थना करत आहे. त्या प्रार्थनेचा यजमानांवर सकारात्मक परिणाम होत आहे आणि पुढील प्रक्रिया होत आहे’, असे मला वाटत होते.
२ ओ ३. साधिकेच्या यजमानांसाठी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर त्यांचे शारीरिक त्रास न्यून होणे : यजमानांसाठी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर यजमानांच्या शारीरिक स्वास्थ्यामध्ये अकस्मात् चांगला पालट झाला आणि दुसर्या दिवशीसुद्धा ते बरे होते. त्यांच्या वेदना थोड्या न्यून झाल्या आणि ते नेहमीपेक्षा शांत होते. दुसर्या दिवशी पौर्णिमा असूनही त्यांना इतका त्रास झाला नाही. ‘साक्षात् देवीनेच ही पुष्कळ मोठी अनुभूती दिली’, असे मला वाटले.
३. साधिकेला तिच्या यजमानांच्या मृत्यूपूर्वी जाणवलेली सूत्रे
३ अ. साधिकेच्या यजमानांच्या शारीरिक त्रासांत पुन्हा वाढ होणे : पौर्णिमेच्या दुसर्या दिवसापासून, म्हणजे २५.६.२०२१ या दिवसापासून त्यांचा त्रास परत वाढत गेला. २७.६.२०२१ या दिवशी माझ्या मनात विचार आला, ‘आता २ दिवसांत बहुतेक काहीतरी होणार.’
३ आ. २९.६.२०२१ या दिवशी सकाळी ११ वाजता यजमानांनी मला हाक मारली आणि जवळ बोलावून इंग्रजीतून सांगितले, ‘‘टुडे आय ॲम गोईंग टु डाय’, म्हणजे आज मी मरणार आहे.’’
४. साधिकेच्या यजमानांचा मृत्यू
साधिकेच्या यजमानांनी मृत्यूपूर्वी त्यांना भूमीवर झोपवण्यासाठी हट्ट करणे, भूमीवर झोपवल्यानंतर त्यांनी हात जोडून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राला २ वेळा नमस्कार करणे आणि त्यानंतर ३० मिनिटांनी त्यांचा मृत्यू होणे : त्या दिवशी देवाने मला तिथेच त्यांच्या जवळ थांबवून घेतले. सकाळी ११.३० वाजता त्यांनी हट्ट केला. ते मला म्हणाले, ‘‘मला बाहेरील खोलीमध्ये घेऊन जा. मला तिथे खाली भूमीवर झोपायचे आहे.’’ तेव्हा मी पटकन त्यांच्या पलंगाच्या बाजूलाच एक सतरंजी अंथरली आणि चौघांच्या साहाय्याने त्यांना उठवून खाली झोपवले. त्यानंतर काही मिनिटांत ते शांत झाले. मी त्यांच्या डोक्याजवळ त्यांना दिसेल, असा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ ठेवला. त्या स्थितीतसुद्धा त्यांनी २ वेळा परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राला हात जोडून नमस्कार केला.
खाली झोपवल्यानंतर साधारण ३० मिनिटांनी त्यांनी आमच्याकडे पहात शांतपणे डोळे मिटले. तेव्हा त्यांचे हृदयाचे ठोके बंद झाले होते. काही सेकंदांमध्ये त्यांनी शेवटचे १ – २ श्वास घेतले आणि ते गेले. सर्वकाही शांतपणे झाले.
५. साधिकेचे यजमान रुग्णाईत असतांना तिला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे
५ अ. असह्य शारीरिक त्रास होत असतांनाही सकारात्मक रहाणे : गेल्या ६ मासांपासून त्यांना पुष्कळ शारीरिक त्रास होत होते. तेव्हा ‘नरकयातना म्हणजे काय असतात ?’, हे मला पहायला मिळाले. त्यांना इतके त्रास आणि वेदना होत होत्या, तरी ते शेवटच्या १५ दिवसांपर्यंत पुष्कळ सकारात्मक राहू शकले.
५ आ. सेवेची तळमळ : ‘सतत भजने ऐकणे, नामजप लावून ठेवणे आणि ‘सोशल मिडिया’ची सेवा करणे’, हे सर्व ते केवळ गुरुकृपेनेच करू शकले’, असे मला वाटते. त्यांनी १२.६.२०२१ पर्यंत त्यांच्या जोडलेल्या गटांना ‘जागो हिंदू’च्या पोस्ट पाठवल्या. त्या दिवसापर्यंत त्यांनी ‘सोशल मिडिया’ची सेवा चालू ठेवली. झोपलेल्या स्थितीत पुष्कळ थकवा आलेला असतांनाही चष्मा मागवून सकाळी ते काही पोस्ट पाठवण्याची सेवा करायचे.
५ इ. इतरांचा विचार करणे : शेवटच्या मासापर्यंत त्यांना अनेक जणांचे भ्रमणभाष यायचे; पण ते कधी त्यांच्या प्रकृतीविषयी कुणाला सांगत नव्हते. त्यांना काही रुग्णांचे किंवा साधकांचे उपचारांविषयी भ्रमणभाष यायचे. तेव्हा ते त्यांना वैद्यकीय उपाय सुचवायचे.
५ ई. इतके आजारी असूनही त्यांच्यातील स्वच्छता आणि व्यवस्थितपणा हे गुण शेवटपर्यंत दिसून यायचे.
५ उ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा : त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पुष्कळ श्रद्धा होती. ते म्हणायचे, ‘‘हे सर्व माझ्या प्रारब्धाचे भोग आहेत.’’ असह्य वेदना होत असूनही ‘देवच मला यातून बाहेर काढणार आहे’, अशी त्यांची श्रद्धा होती आणि म्हणूनच ‘ते सर्व सहन करू शकले’, असे मला वाटते.
६. साधिकेच्या यजमानांच्या निधनानंतर तिने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांची अनुभवलेली प्रीती !
६ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या प्रेमळ बोलण्यातून शक्ती मिळून साधिकेला स्थिर रहाता येणे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधिकेला यजमानांच्या मृत्यूनंतरच्या सर्व विधींच्या वेळी कृतज्ञता व्यक्त करता येणे : माझ्या यजमानांच्या निधनानंतर मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळताईंचा भ्रमणभाष आला. माझे बोलणे ऐकल्यावर त्यांनी अतिशय प्रेमाने मला समजावून सांगितले, तसेच ‘ताई, तुम्ही केवळ कृतज्ञता व्यक्त करा’, असेही सांगितले. त्यांच्या त्या बोलण्यामुळे जणू देवाने मला शक्ती देऊन अतिशय स्थिर ठेवले. खरोखरच यजमानांच्या मृत्यूनंतरच्या पुढील सर्व विधींच्या वेळी आहे त्या परिस्थितीसाठी मला कृतज्ञता व्यक्त करता आली. ‘प.पू. गुरुदेव, सद्गुरु आणि संत यांची आपल्यावर किती प्रीती आहे !’, असे जाणवून मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.
६ आ. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी ‘देवावर सर्व सोडून दे’, असे सांगून साधिकेला दुःखात अडकू न देणे : बर्याच वेळा मला वाईट वाटायचे आणि मी दुःखीसुद्धा व्हायचे; पण तेव्हा मला सद्गुरु स्वातीताईंचा (सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचा) आधार असायचा. त्या मला ‘देवावर सर्व सोडून दे’, असे सांगायच्या. या दुःखामध्ये सद्गुरु स्वातीताईंनी मला अडकू दिले नाही.
७. कृतज्ञता
‘माझे बाबा डॉ. सुधाकर विश्वनाथ कोरे (वय ८१ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांचे २३.८.२०२० या दिवशी निधन झाले आणि एका वर्षाच्या आत यजमान आधुनिक वैद्य (डॉ.) कोठावळे यांचे निधन झाले, तरी गुरुदेवांच्याच कृपेने अन् सद्गुरु आणि संत यांच्या सत्संगामुळे आम्ही स्थिर राहून अन् योग्य दृष्टीकोन लक्षात घेऊन या प्रसंगांना सामोरे जाऊ शकलो’, याविषयी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– आधुनिक वैद्या (डॉ.) श्रीमती शिल्पा नितीन कोठावळे (पत्नी), नवे पारगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. (२१.७.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |