मंत्रालयात आढळल्या मद्याच्या रिकाम्या बाटल्या !
विरोधी पक्षाकडून अन्वेषणाची मागणी
मंत्रालय कि मद्यालय ? राज्याचे प्रशासकीय कामकाज चालणार्या ठिकाणी मद्याच्या रिकाम्या बाटल्या आढळणे, हा लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यासाठी लज्जास्पदच ! – संपादक
मुंबई – मंत्रालयातील राजपत्रित अधिकार्यांच्या उपहारगृहाच्या खालील बाजूस मोठ्या प्रमाणात मद्याच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत. या प्रकरणी सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ‘अन्वेषण करण्यात येईल’, असे म्हटले आहे. सध्या कोरोनामुळे मंत्रालयात केवळ अधिकारी आणि कर्मचारी वर्ग, तसेच रितसर अनुमती घेतलेल्या नागरिकांनाच प्रवेश दिला जातो. प्रवेशाच्या वेळीही नागरिकांची रितसर पडताळणी केली जाते. मंत्रालयात केवळ मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या गाड्यांनाच अनुमती आहे. त्यामुळे यांतील कोणत्या माध्यमातून मद्याच्या बाटल्या मंत्रालयात नेण्यात आल्या आणि त्या कुणी नेल्या ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
मंत्रालयात पुन्हा एकदा दारुच्या बाटल्यांचा खच @News18lokmat pic.twitter.com/Vf6Ytbe11v
— News18Lokmat (@News18lokmat) August 10, 2021
याविषयी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, ‘‘ही अत्यंत गंभीर बातमी आहे. या प्रकरणाचे योग्य ते अन्वेषण करून दोषींवर कारवाई केली जाईल. मंत्रालयाची संपूर्ण सुरक्षाव्यवस्था पोलीस प्रशासनाकडेच असते; पण मंत्रालय म्हणजे सर्व मंत्री आणि सर्व विभाग यांचा विषय येतो. हा केवळ गृहमंत्री किंवा पोलीस यांचा विषय नाही. या प्रकाराचे कसून अन्वेषण केले जाईल.’’ (पोलिसांची पाठराखण करण्यापेक्षा मद्याच्या बाटल्या मंत्रालयात नेणारे दोषी कोण आहेत ? याचा शोध घ्यावा, असे जनतेला अपेक्षित आहे. – संपादक)
मद्याच्या बाटल्या मंत्रालयात कुणी आणि कशासाठी आणल्या ? याचे अन्वेषण झाले पाहिजे ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद
मंत्रालयामध्ये मद्याच्या बाटल्या सापडणे, ही अत्यंत दुर्दैवी, चीड आणणारी आणि लाजिरवाणी घटना आहे. मंत्रालयामध्ये सर्वसामान्य नागरिकांना स्वत:च्या न्यायहक्कांसाठी प्रवेश मिळणे दुरापास्त असतांना मद्याच्या बाटल्या मंत्रालयामध्ये कशा पोचू शकतात ? मद्याच्या बाटल्या मंत्रालयामध्ये कुणी आणि कशासाठी आणल्या ? या सर्व प्रकाराचे अन्वेषण झाले पाहिजे. संबंधितांवर कारवाई झालीच पाहिजे. या प्रकारावरून सरकारची मानसिकता दिसून येते.