आझाद मैदानावरील दंगलीच्या ९ वर्षांनंतरही पोलीस न्यायाच्या प्रतीक्षेत !
दंगलीला ९ वर्षे पूर्ण झाल्याचा आजचाच तो काळा दिवस !
मुंबई – महाराष्ट्रातील महिला पोलिसांच्या अब्रूला हात घालण्याचे आणि सैनिकांच्या त्यागाचे प्रतीक असलेले ‘अमर जवान’ हे स्मारक लाथ मारून तोडण्याचे कुकृत्य धर्मांधांनी केले, तो ११ ऑगस्ट २०१२ हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक काळा दिवस ! या दिवशी आझाद मैदानावर झालेल्या दंगलीला आज ९ वर्षे पूर्ण झाली. या दंगलीचा खटला न्यायालयात चालू आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेले सर्व ६० आरोपी जामिनावर मुक्त झाले असून पोलीस मात्र अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. (९ वर्षांनीही न्याय न मिळणे हा अन्यायच ! पोलिसांवरील अत्याचारांच्या प्रकरणाची अशी स्थिती असेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी न्यायाची अपेक्षा कशी ठेवावी ? – संपादक)
हा खटला न्यायालयात असला, तरी ९ वर्षांनंतरही खटल्यातील साक्षीदारांच्या सुनावणीला प्रारंभही झालेला नाही. या खटल्यात ८५० साक्षीदार आहेत. या साक्षीदारांची साक्ष कधी घेणार आणि प्रत्यक्ष न्याय देण्यासाठी आणखी किती वर्षे लागणार ? हा प्रश्नच आहे.
गुन्हा रहित करण्यासाठी ९ आरोपींचा अर्ज !
या खटल्यातील आरोपींपैकी ९ जणांनी त्यांच्यावरील गुन्हा रहित करण्यात यावा, यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. यावर अद्याप सुनावणी झालेली नाही.
हानीभरपाईच्या वसुलीचे काय ?
दंगलखोरांनी केलेली जाळपोळ आणि तोडफोड यांमध्ये २ कोटी ७४ लाख रुपयांची हानी झाली होती. ही हानीभरपाई अद्यापही वसूल करण्यात आलेली नाही. याविषयी एका पोलीस अधिकार्याने सांगितले की, दंगलीमध्ये मोठ्या प्रमाणात जमाव असल्यामुळे ही हानीभरपाई नेमकी कुणाकडून आकारायची ? याची अडचण येते.
महिला पोलिसांच्या अब्रूवरील घाला हा महाराष्ट्रावरील कलंक !
सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी उभ्या असलेल्या महिला पोलिसांनाही या नराधमांनी सोडले नाही. या खटल्यातील महिला पोलिसांनी दिलेली साक्ष पाहिल्यास या नराधमांची पाशवी वृत्ती दिसून येते. एका महिला पोलिसाने दिलेल्या साक्षीत म्हटले आहे की, दंगलखोरांनी त्या महिला पोलिसाचे कपडे फाडले. त्या वेळी एका दुकानातील अन्य व्यक्तीने स्वत:चा शर्ट काढून त्या महिला पोलिसाला दिला. धर्मांधांनी अन्य एका महिला पोलिसाचा शर्ट फाडल्यामुळे तिने तिचे साधे कपडे परिधान केले. एवढे करूनही धर्मांध थांबले नाहीत, तर ‘पोलीस व्हॅन’मध्ये चढलेल्या महिला पोलिसांना त्यांनी गाडीतून बाहेर ओढले. त्यांचा हात पकडला आणि त्यांना लज्जास्पद वाटेल, अशा प्रकारे स्पर्श केला. पोलिसी गणवेशातील विजार पकडून महिला पोलिसांना खेचले. असे सर्व महिला पोलिसांनी त्यांच्या साक्षीत लिहिले आहे. या सर्वांतून धर्मांधांची राक्षसी वृत्ती दिसून येते.
… हे महाराष्ट्राच्या हिताचे ठरेल !
म्यानमार येथे रोहिंग्या मुसलमानांवर अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ रझा अकादमी या मुसलमान संघटनेच्या आवाहनावरून हा मोर्चा काढण्यात आला होता. मुसलमान नेत्यांनी मोर्च्यात चिथावणीखोर भाषणे केली. त्यानंतर अचानकच मोर्च्यात दबा धरून असलेल्या शेकडो धर्मांधांनी दगड, विटा, ज्वलनशील पदार्थ, सळ्या यांद्वारे पोलीस, नागरिक, पत्रकार यांवर आक्रमण चालू केले. त्यांनी दिसेल त्याची हानी करण्यास प्रारंभ केला. धर्मांधांनी आझाद मैदानाच्या बाहेर रस्त्यावर रहदारीत थांबलेली वाहनेही फोडली. बसगाड्या, पोलिसांच्या गाड्या, पत्रकारांच्या ‘ओबी व्हॅन’ यांचीही तोडफोड करण्यात आली. अशा प्रकारे धर्मांधांनी नियोजनबद्धपणे केलेल्या या आक्रमणात एका पोलिसाला प्राण गमवावा लागला. पोलीस, पत्रकार आणि सर्वसामान्य नागरिक यांवरील हे एक नियोजनबद्ध आक्रमण होते. ९ वर्षांनी ही घटना अनेकांच्या विस्मृतीत गेली असली, तरी भविष्यातील सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पोलीस, प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिक यांनी धर्मांधांच्या या वृत्तीचे स्मरण ठेवून त्या अनुषंगाने सुरक्षिततेची सिद्धता ठेवणे, हे केवळ स्वत:च्याच नव्हे, तर महाराष्ट्राच्याही हिताचे ठरेल !