सिंधुदुर्गात आशा वर्कर्स, रंगकर्मी आणि माध्यमिक शिक्षक संघटना यांची आंदोलने
सिंधुदुर्ग – जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्गनगरीत ९ ऑगस्ट या क्रांतीदिनी काही संघटनांनी आंदोलने केली. जिल्ह्यातील रंगकर्मी आणि माध्यमिक शिक्षक संघटना यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले, तर ‘आशा वर्कर्स’नी (तळागाळात आरोग्य सेवा पुरवणारे तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचारी) ओरोस फाटा येथे ‘कारागृह भरा’ आंदोलन करून शासनाचे त्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधले.
रंगकर्मींच्या मागण्यांकडे लक्ष द्या ! – जिल्ह्यातील रंगकर्मींची मागणी
सिंधुदुर्ग – कोरोना महामारीच्या काळात शासनाने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. त्यामुळे चित्रपट, मालिका, नाटक, तमाशा, भजन, कीर्तन, भारूड, गोंधळ, पोवाडा, लावणी, दशावतारी, डोंबारी, अशा विविध कला आणि लोककला सादर करणार्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. रंगकर्मी कलाकारांकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि रंगकर्मींच्या विविध मागण्यांसाठी ‘रंगकर्मी आंदोलन सिंधुदुर्ग’ या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी रंगकर्मींच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. कोरोनाच्या नियमांचे पालन करत करण्यात आलेल्या या आंदोलनात हार्दिक शिंगले, दादा कोनस्कर-राणे, सुधीर कलिंगण, देवेंद्र नाईक, नमिती गावकर आदींसह जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील नाट्यकर्मी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
विविध मागण्यांसाठी आशा वर्कर्सचे कारागृह भरा आंदोलन !
आरोग्य अभियान कायम चालू ठेवावे, आशा कर्मचार्यांना आरोग्य कर्मचारी म्हणून सेवेत कायम करावे, वाढीव मानधनाचे आदेश तात्काळ द्यावेत, जनविरोधी कृषी कायदे, कामगार विरोधी कायदे यांमध्ये सुधारणा करावी आदी मागण्यांसाठी आशा वर्कर्सनी ‘कारागृह भरा’ आंदोलन केले.