मडगाव येथील कुख्यात गुंड अन्वर शेख हत्येच्या प्रकरणी कर्नाटक पोलिसांकडून इम्रान चौधरी याला अटक
|
पणजी, ९ ऑगस्ट (वार्ता.) – कर्नाटक पोलिसांनी मडगाव येथील कुख्यात गुंड अन्वर शेख याच्या हत्येच्या प्रकरणी कारवाईला प्रारंभ केला आहे. या हत्येच्या प्रकरणी कर्नाटकातील हावेरी पोलिसांनी इम्रान चौधरी याला अटक केली आहे. सध्या त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. इम्रानला कह्यात घेतल्यामुळे त्याची हत्या करणार्या इतरांचा शोध लवकर लागेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अन्वर शेख याच्यावर हावेरी (कर्नाटक) येथे ८ ऑगस्टला ४ जणांनी मिळून आक्रमण केले होते. या आक्रमणाची चित्रफीत सामाजिक प्रसारमाध्यमांतून प्रसारित झाली आहे. अन्वर शेख याच्यावर धारदार कुर्हाडीने वार करण्यात आले आणि त्यानंतर गंभीररित्या घायाळ झालेल्या अन्वरचा तेथेच मृत्यू झाला. भररस्त्यात झालेल्या या हत्येमुळे या भागातील कायदा आणि सुव्यवस्था यांविषयी प्रश्न उपस्थित केला जात आहे. बलात्कार, अपहरण, जिवे मारण्याच्या धमक्या देणे, मारामारी, दरोडा घालणे, असे सुमारे २६ गुन्हे अन्वर शेख याच्यावर प्रविष्ट करण्यात आले होते. ( अशा गुंडाला जामिनावर कारागृहाबाहेर जाऊ देणारी यंत्रणा किंवा कायदेच कुचकामी नाहीत का ? – संपादक) कर्नाटकातील हावेरी तालुक्यातील सवनुरु हे अन्वरचे जन्मठिकाण असून तो काही दिवसांपासून त्या ठिकाणीच वास्तव्याला होता.